युरोपियन अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेमधील मिळवलेले यश कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत प्रतिबिंबित करण्याचा फ्रान्सचा प्रयत्न असेल. इ-गटात समावेश असलेल्या फ्रान्सची पहिली लढत नवख्या न्यू कॅलेडोनियाविरुद्ध रविवारी आहे. त्यामुळे फ्रान्सच्या दृष्टीने हा सोपा पेपरच असणार आहे.

वरिष्ठ फुटबॉलमधील एक बलाढय़ संघ अशी फ्रान्सची ओळख असली तरी कुमारांच्या गटात त्यांना तितक्या प्रमाणात यश मिळवता आलेले नाही. मात्र कुमार गटाच्या युरा स्पर्धेत यंदा त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

इ-गटातून फ्रान्स आणि जपान यांना बाद फेरीत स्थान मिळवणे फारसे कठीण जाणार नाही. कारण होंडुरास आणि न्यू कॅलेडोनिया यांची ताकद मर्यादित आहे.

इ गट

न्यू कॅलेडोनिया वि. फ्रान्स

स्थळ : इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियम, गुवाहाटी

सकारात्मक सलामीसाठी जपान उत्सुक
गुवाहाटी : आशियाई महासत्ता’ म्हणून ओळख असलेला जपान कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पहिल्याच लढतीत होंडुरासला नमवून सकारात्मक सुरुवात करण्यास उत्सुक आहे. १९९३ मध्ये यजमान या नात्याने जपानला पदार्पणाची संधी मिळाली होती. त्यावेळी या संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मुसंडी मारली होती. मग २०११मध्ये अर्जेटिना, फ्रान्स आणि जपान यांच्यासारख्या दिग्गजांच्या गटात समावेश असूनही जपानने गटविजेतेपदासह उपांत्यपूर्व फेरीपर्यंत वाटचाल केली होती.

अनेक मैत्रीपूर्ण सामने आणि विशेष सराव सत्रांसह जपानचा संघ विश्वचषक स्पर्धेत उतरला आहे. जपानचा माजी बचावपटू योशिरो मोरियामा यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ आश्चर्यकारक कामगिरी करून दाखवू शकतो.

इ गट

होंडुरास वि. जपान

स्थळ : इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियम, गुवाहाटी

दिग्गज खेळाडूंच्या इंग्लंडचा आज चिलीशी सामना
कोलकाता : कोलकाता शहरातील फुटबॉल महोत्सवाला रविवारपासून खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या इंग्लंडचा कुमार विश्वचषकातील पहिला सामना सॉल्ट लेक स्टेडियमवर धक्कादायक कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या चिलीविरुद्ध रंगणार आहे.

विवेकानंद युवा भारतीय क्रीडांगण हे अधिकृत नाव धारण करणाऱ्या या स्टेडियमवर सुमारे एक वर्ष आणि आठ महिन्यांनी हा सामना होत आहे. कोलकातामधील उष्ण वातावरणाचे आव्हान पेलून आमचा संघ विश्वचषकात दमदार सलामी नोंदवेल, असा निर्धार इंग्लंडचे प्रशिक्षक स्टीव्ह कूपर यांनी केला आहे. व्यावसायिक लीगचा अनुभव गाठीशी असणाऱ्या अँजेल गोम्स, जाडॉन सांचो यांच्यासारख्या खेळाडूंमुळे इंग्लंडचा संघ अधिक मजबूत मानला जात आहे.

फ गट

चिली वि. इंग्लंड

स्थळ : विवेकानंद युवा भारतीय क्रीडांगण, कोलकाता

बलाढय़ मेक्सिकोपुढे इराकचे कडवे आव्हान
कोलकाता : दोन वेळा विश्वविजेत्या मेक्सिकोचा संघ फ-गटातील सर्वात शक्तिशाली संघ मानला जात आहे. परंतु कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत आशियाई विजेत्या इराकचे कडवे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.

२००५मध्ये पेरू येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेपासून मेक्सिकोने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. सहा वर्षांच्या अंतराने दोनदा जेतेपद, २०१३ मध्ये उपविजेतेपद आणि २०१५मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल हे त्यांचे आतापर्यंतचे यश.

इराकने २०१३मध्ये प्रथमच आणि एकदाच विश्वचषकात प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी त्यांनी आपले सर्व सामने गमावले होते. आशियाई स्पर्धेत इराणला नमवून विश्वचषकासाठी पात्र ठरणाऱ्या इराककडून यंदा मोठय़ा अपेक्षा आहेत.

फ गट

इराक वि. मेक्सिको

स्थळ : विवेकानंद युवा भारतीय क्रीडांगण, कोलकाता

आजचे सामने

*  वेळ : सायंकाळी ५ वा.

इ-गट : न्यू कॅलेडोनिया वि. फ्रान्स

फ-गट : चिली वि. इंग्लंड

* वेळ : रात्री ८ वा.

इ-गट : होंडुरास वि. जपान

फ-गट : इराक वि. मेक्सिको

* थेट प्रक्षेपण

इंग्रजी : सोनी टेन २ व टेन २ एचडी, सोनी ईएसपीएन व ईएसपीएन एचडी;

हिंदी व बंगाली : सोनी टेन ३ व टेन ३ एचडी.