भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीर याचे तब्बल दोन वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱया कसोटी सामन्यासाठी गंभीरचा भारतीय संघात समावेश करण्यात आले आहे. कानपूर कसोटीत लोकेश राहुलला दुखापत झाल्याने तो कोलकाता कसोटीला मुकणार आहे. लोकेश राहुलच्या जागी गंभीरचा संघात समावेश करण्यात आला. भारतीय संघातील पुनरागमनाबाबत गौतम गंभीर म्हणतो, मी काहीही गमावले नाही, देशासाठी आता पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळाली. प्रदीर्घ काळानंतर आता माझ्या डोक्यावर भारतीय संघाची कॅप असेल. त्यामुळे माझ्या पदार्पणासाठी प्रार्थना करणाऱयांचे आणि ‘बीसीसीआय’चे विश्वास दाखवल्याबद्दल आभार, अशी भावना गंभीरने ट्विटरवर व्यक्त केली. याशिवाय, पदार्पण करताना एखाद्या नवख्या खेळाडूला जी उत्सुकता असते, तोच अनुभव निवड झाल्यामुळे येत आहे. अस्वस्थता, पदार्पणाची उत्सुकता अशा अनेक भावना मनात दाटून आल्या आहेत. त्यामुळे ईडन गार्डन्सवर अनेक अपेक्षा घेऊन मैदानात उतरणार आहे, असेही ट्विट गंभीरने केले आहे.

वाचा: गौतम गंभीरचे भारतीय संघात पुनरागमन, जयंत यादवलाही संधी

गौतम गंभीरने नुकतेच दुलीप करंडक स्पर्धेत ७१ च्या सरासरीने तब्बल ३५६ धावा कुटल्या होत्या. यामध्ये ९०, ९६ आणि एका अर्धशतकी खेळीचा समावेश आहे. स्थानिक क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीचे फलित म्हणूनच गौतम गंभीरला संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मिळालेल्या संधीचे गौतम गंभीर सोने करणार का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.