सहा ग्रँडस्लॅम जेतेपदांची कमाई करणारा ख्यातनाम माजी टेनिसपटू बोरिस बेकरला दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आले आहे. एका बँकेचे कर्ज थकवल्याने ब्रिटनमधील न्यायालयाने बेकरला दिवाळखोर म्हणून जाहीर केले आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी बेकरला आणखी एक संधी द्यावी अशी विनंती त्याच्या वकिलांनी कोर्टात केली होती. मात्र ही विनंती फेटाळून लावत कोर्टाने बेकरला दणका दिला.

मूळचा जर्मनीचा पण सध्या ब्रिटनमधील लंडन येथे राहणाऱ्या बोरिस बेकरने आर्बटनोट लँथम अँड कंपनी या बँकेचे कर्ज २०१५ पासून थकवले होते. यासंदर्भात बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. बेकरच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद रजिस्ट्रार क्रिस्टीन डेरेट यांनी फेटाळून लावला. ‘बेकर कर्जाची परतफेड करु शकेल असे वाटत नाही’ असे नमूद करत डेरेट यांनी २८ दिवसांसाठी याप्रकरणाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती फेटाळून लावली. न्यायालयाने बेकरला दिवाळखोर म्हणून घोषित केले. विशेष म्हणजे रजिस्ट्रार डेरेट यांनी निकाल देताना बोरिस बेकरला खेळताना बघितले होते असा उल्लेखही केला.

४९ वर्षीय बेकरचा जन्म जर्मनीत झाला होता. त्यानंतर बेकर लंडनमधेये आला होता. मात्र लंडनमध्ये येऊनदेखील तो जर्मनीकडून टेनिसच्या मैदानात उतरायचा. नोवाक जोकोविचलाही बेकरनेच प्रशिक्षण दिले असून सध्या तो समालोचक म्हणूनही काम करतो. बेकरचे वकिल जॉन ब्रिग्स यांनी कोर्टात युक्तिवाद करताना बेकरकडे कर्जाची परतफेड करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. आर्थिक नियोजन करुन तो कर्जाची परतफेड करु शकेल असा युक्तिवाद केला. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.

बोरिस बेकरने १९८५, १९८६ आणि १९८९ साली विम्बल्डनमध्ये जेतेपद पटकावले होते. याशिवाय १९९१ आणि १९९६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, १९८९ मध्ये यूएस ओपनमध्येही त्याने बाजी मारली होती. १९८८ आणि १९८९ मध्ये त्याने डेव्हिस कपमध्ये पश्चिम जर्मनीला विजेतेपद पटकावून दिले होते.