खराब कामगिरीचं कारण देऊन माजी प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांची हकालपट्टी केल्यानंतर हॉकी इंडियाने भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकांसाठी शोधमोहीम सुरु केली आहे. यावेळी प्रशिक्षकाची निवड करताना हॉकी इंडियाने, बीसीसीआयप्रमाणे जाहीरात करण्याचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत ‘हॉकी इंडिया’ प्रशिक्षक नेमताना केवळ इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवत होती. मात्र टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानूसार, ओल्टमन्स यांच्यानंतर हॉकी इंडियाने प्रशिक्षकपदाच्या निवडीची जाहीरात करण्याचं ठरवलं आहे. येत्या काही दिवसांमध्येच ‘हॉकी इंडिया’ आणि ‘साई’ या संस्थांच्या संकेतस्थळांवर ही जाहीरात टाकण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवीन प्रशिक्षक निवडेपर्यंत २ ते ३ महिन्यांचा कालावधी सहज लागेल असा हॉकी इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना अंदाज आहे, त्यामुळे या कालावधीत भारतीय संघाचे High Performance Director डेव्हिड जॉन हे संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार आहेत.

वर्ल्ड हॉकीलीग उपांत्य स्पर्धेत भारताच्या खराब कामगिरीचं कारणं देत हॉकी इंडियाच्या २४ सदस्यीय समितीने ओल्टमन्स यांना आपल्या पदावरुन पायउतार होण्यास भाग पाडलं होतं. भारतीय हॉकीसाठी ओल्टमन्स यांनी अवलंबलेल्या दीर्घकालीन उपाययोजना हॉकी इंडियाला नकोश्या झाल्या होत्या, झटपट निकाल मिळवून देणारा प्रशिक्षक सध्या भारतीय संघाला हवा असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी डेव्हिड जॉन यांनी केलं होतं. त्यामुळे ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीवरुन क्रीडा जगतात आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

अवश्य वाचा – BLOG : बुडत्याचा पाय खोलात !

सध्यातरी नवीन प्रशिक्षकांच्या निवडीसाठी हॉकी इंडियाने बीसीसीआयचा मार्ग अवलंबायचा ठरवलाय. मात्र प्रशिक्षक निवडीवरुन बीसीसीआयमध्ये झालेला सावळा गोंधळ पाहता हॉकी इंडिया आपले नवीन प्रशिक्षक योग्य पद्धतीने निवडेल अशी अपेक्षा क्रीडारसिक वर्तवत आहेत.