२०२१ची भारतात होणारी स्पर्धा रद्द होण्याची शक्यता; चार वर्षांत दोन विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेची योजना

चार वर्षांत दोन विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळवण्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) योजना असल्यामुळे भारतात होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेचे भवितव्य अधांतरी आहे.

रविवारी झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत पाकिस्तानकडून १८० धावांनी पराभव पत्करणाऱ्या भारताने २०२१मध्ये होणाऱ्या आगामी स्पध्रेचे यजमानपद मात्र मिळवले आहे. या स्पध्रेला क्रिकेटरसिकांनी उत्तम प्रतिसाद देऊनही या स्पध्रेपुढे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी माहिती आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्ड्सन यांनी दिली.

‘‘चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा २०२१मध्ये होण्याची खात्री नाही. दी ओव्हल येथे होणाऱ्या आयसीसी वार्षिक परिषदेत हा विषय चर्चेला येणार आहे,’’ अशी माहिती रिचर्ड्सन यांनी दिली.

‘‘सध्या तरी २०२१मध्ये चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा भारतात घेण्याचे नियोजन आहे. मात्र चार वर्षांत ट्वेन्टी-२० प्रकाराच्या दोन विश्वचषक स्पर्धा घेण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा रद्द होऊ शकते,’’ असे त्यांनी सांगितले.

आयसीसी विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत भविष्यात २० संघ सहभागी होणार आहेत, असे संकेत या वेळी रिचर्ड्सन यांनी दिले. ते म्हणाले, ‘‘विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत क्रिकेटरसिकांना अतिशय रस आहे. याचप्रमाणे टीव्ही प्रक्षेपण कंपन्यांनाही या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळेच अधिकाधिक संघांना संधी देऊन ही स्पर्धा आणखी लोकप्रिय करण्याचा आयसीसीचा मानस आहे.’’

‘‘मागील विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत १० संघ सहभागी झाले होते. मात्र पुढील स्पध्रेत १६ किंवा कदाचित २० संघसुद्धा सहभागी होऊ शकतील. ज्यामुळे विश्वचषकातील स्पर्धात्मकता आणि दर्जा अधिक वाढू शकेल. त्यामुळे ५० षटकांच्या दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळवणे कठीण आहे,’’ असे विश्लेषण रिचर्ड्सन यांनी केले.