विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत पहिला गुण मिळवण्यासाठी भारताला ओमानविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. हा सामना मंगळवारी होणार आहे.
जागतिक क्रमवारीत ओमानला १०२वे स्थान असून भारत १६७व्या क्रमांकावर आहे. भारताला या पात्रता फेरीत गुआम या दुय्यम संघाविरुद्धही पराभव पत्करावा लागला होता. साहजिकच भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन व संघातील खेळाडूंवर खूप दडपण आले आहे. पाच संघांच्या या गटात भारतास आतापर्यंत केवळ तीनच गोल नोंदविता आले आहेत. घरच्या मैदानावर ओमान संघाचे पारडे जड मानले जात आहे. त्यांनी पात्रता फेरीत यापूर्वी बलाढय़ इराणला १-१ असे बरोबरीत रोखले होते.
तुर्कमेनिस्तानविरुद्ध भारतास नुकताच १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. तुर्कमेनिस्तानविरुद्ध भारताने एक गोल नोंदविण्यात यश मिळविले, तरीही या सामन्यात त्यांची कामगिरी अपेक्षेइतकी झाली नाही. विशेषत: बचाव फळीत त्यांच्या खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. तसेच शारीरिक क्षमतेमध्येही भारतीय खेळाडू कमकुवत होते.