अखेरच्या सामन्यात अब्रू वाचवण्यासाठी भारताला संधी

निर्भेळ यश मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका सज्ज

तिसरा ट्वेन्टी-२० सामना आज रंगणार

दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे, त्यामुळे त्यांना ही तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका जिंकता येणार नाही, हे स्पष्ट आहे. पण गुरुवारी इडन गार्डन्सवर होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यामध्ये अब्रू वाचवण्याची संधी असेल. भारतीय चाहते या कामगिरीने नाराज असून तिसरा सामना जिंकून तरी लाज राखा, अशी भावना ते व्यक्त करत आहेत.  दुसरीकडे पहिल्या दोन्ही सामन्यांत दमदार विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने भारताचा चांगलाचा पाहुणचार घेतला आहे. त्यामुळे अखेरचा सामना जिंकत मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

रोहित शर्माच्या शतकाचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांना दोन्ही सामन्यांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांनी तर भारताच्या फलंदाजांची फे फे उडवली होती आणि त्यामुळेच त्यांचा डाव ९२ धावांवर संपुष्टात आला होता. भारतीय संघातील फलंदाजांनी या पराभवातून शिकण्याची गरज आहे. फॉर्मात असलेल्या अजिंक्य रहाणेला वगळून दोन्ही सामन्यांमध्ये अंबाती रायुडूला खेळवण्याचा निर्णय अनाकलनीय असून, त्याचा निकालही साऱ्यांपुढे आहे. त्यामुळे या सामन्यात अजिंक्यला संधी मिळेल, अशी आशा वर्तवली जात आहे. भारतीय गोलंदाजीमध्ये आर. अश्विनचा अपवादकरता एकाही गोलंदाजाला छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे भारताला जर हा सामना जिंकून आपली अब्रू वाचवायची असेल तर त्यांना अथक मेहनत घेण्याची गरज आहे.

आफ्रिकेने आतापर्यंत तिन्ही आघाडय़ांवर भारतीय संघापेक्षा उजवी कामगिरी केली आहे. फलंदाजीमध्ये एबी डी’व्हिलियर्स आणि जेपी डय़ुमिनी यांनी आतापर्यंत चोख फलंदाजीचा नमुना पेश करत भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आहे. पण अन्य फलंदाजांना अजून फॉर्म गवसलेला नाही आणि हीच त्यांच्यासाठी चिंतेची बाब असेल. अ‍ॅल्बी मॉर्केलने संघात पुनरागमन कसे करावे, याचा उत्तम वस्तुपाठ कटक येथील दुसऱ्या सामन्यात दाखवून दिला आहे. त्याचबरोबर फिरकीपटू इम्रान ताहिरही चांगल्या लयीत आला आहे. आफ्रिकेचे वेगवान गोलंदाजही चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांनी कामगिरीत सातत्य राखल्यास आफ्रिकेला मालिकेत निर्भेळ यश मिळवणे अवघड जाणार नाही.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टिरक्षक), श्रीनाथ अरविंद, रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, हरभजन सिंग, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोहित शर्मा, रोहित शर्मा.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), कायले अ‍ॅबॉट, हशिम अमला, फरहान बेहरादिन, क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), र्मचट डी लँगे, एबी डी’व्हिलियर्स, जीन-पॉल डय़ुमिनी, इम्रान ताहिर, एडी लीई, डेव्हिड मिलर, अ‍ॅल्बी मॉर्केल, ख्रिस मॉरिस, कॅगिसो रबाडा, खाया झोंडो.

सामन्याची वेळ  : सायंकाळी ७ वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी वाहिनीवर.