दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना आज

आपल्याच मातीत पहिल्याच ट्वेन्टी-२० सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारतीय संघ आपले दु:ख लपवू शकलेला नसला तरी सोमवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात त्यांच्यापुढे बरोबरीची अखेरची संधी असेल. तीन ट्वेन्टी-२० सामन्याच्या मालिकेत भारताने जर हा सामना जिंकला तर त्यांचे आव्हान जिवंत राहू शकते, पण जर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला तर त्यांना विजयी आघाडी घेता येईल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असेल.

नक्की वाचा:-दक्षिण आफ्रिकेची भारतावर मात

पहिल्या सामन्यात रोहित शर्मा वगळता एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नव्हती. रोहितने दमदार शतक लगावत आपण फॉर्मात असल्याचे दाखवून दिले. पण शिखर धवन, सुरेश रैना, अंबाती रायुडू यांना आपल्या स्थानाला न्याय देता आला नाही. विराट कोहलीने काही धावा केल्या असल्या तरी त्याच्यामध्ये पूर्वीसारखी आक्रमकता दिसली नाही. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला गेल्या काही महिन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही.

गोलंदाजीमध्ये अक्षर पटेलला एकाच षटकात तीन षटकार खेचत दक्षिण आफ्रिकेने विजयाच्या दिशेने ठोस पाऊल टाकले होते. अक्षरच्या गोलंदाजीमध्ये सातत्य पाहायला मिळाले नाही. भुवनेश्वर कुमार, आर. अश्विनसारख्या अनुभवी गोलंदाजांनाही आपली छाप पाडता आली नाही. कर्णधार धोनी सध्याच्या घडीला मोक्याच्या क्षणी निर्णय घेताना कुठेतरी अपयशी ठरताना दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघाने सिंहावलोकन करण्याची गरज सध्याच्या घडीला दिसत आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नसली तरी त्यांच्या फलंदाजांनी मात्र पहिल्या सामन्यात धडाकेबाज कामगिरी केली होती. ए बी डी’व्हिलियर्स आपल्या नावाला जागला आणि त्याने संघाच्या विजयाचा भक्कम पाया रचला होता. त्यावर जे पी डय़ुमिनीने कळस चढवला होता. या दोघांचीही फलंदाजी नजरेचे पारणे फेडणारी होती. पण कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसला मात्र लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. यापुढे जर आफ्रिकेला विजय मिळवायचा असेल तर त्यांना फक्त काही खेळाडूंवर अवलंबून चालणार नाही.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टिरक्षक), श्रीकांत अरविंद, रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, हरभजन सिंग, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोहित शर्मा, रोहित शर्मा.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), कायले अ‍ॅबॉट, हशिम अमला, फरहान बेहरादिन, क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), र्मचट डी लँगे, ए बी डी’व्हिलियर्स, जीन-पॉल डय़ुमिनी, इम्रान ताहिर, एडी लीई, डेव्हिड मिलर, अ‍ॅल्बी मॉर्केल, ख्रिस मॉरिस, कॅगिसो रबाडा, खाया झोंडो.

सामन्याची वेळ

सायंकाळी ७ वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण

स्टार स्पोर्ट्स १ आणि एचडी वाहिनीवर.