अखेर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामन्यात पावसाने बाजी मारली आहे. भारताच्या फलंदाजीवेळी हजेरी लावलेल्या पावसाने नंतर असा काही जोर धरला की थांबायचं नावच घेतलं नाही. अखेर दोन्ही पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ५ सामन्यांची मालिका अजुनही ०-० अशा बरोबरीतच आहे.

त्याआधी चांगली सुरुवात केलेल्या भारतीय फलंदाजीला काही प्रमाणात खिळ बसवण्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना यश आलं. शतकी भागीदारी केलेल्या शिखर धवन- अजिंक्य रहाणे या जोडगोळीला माघारी पाठवल्यानंतर युवराज सिंहदेखील तंबूत परतला. कर्णधार जेसन होल्डरने त्याला बाद केलं. युवराज या सामन्यात केवळ ४ धावा करु शकला. याआधी शतकाच्या जवळ आलेल्या शिखर धवनला फिरकीपटू देवेंद्र बिशूने पायचीत करत माघारी पाठवलं. ९२ चेंडूत शिखरने ८७ धावांची खेळी केली. यामध्ये ८ चौकार आणि २ खणखणीत षटकारांचा समावेश होता. अजिंक्य रहाणेच्या तुलनेत शिखरने जोरदार फटकेबाजी करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. आपल्या खेळीत शिखर धवनने दोन खणखणीत षटकार ठोकत वेस्ट इंडिज गोलंदाजांची पार लयच बिघडवून टाकली. काहीवेळा चोरटी धाव घेताना शिखर धवनच्या हाताला जोरात चेंडू लागून दुखापतही झाली, मात्र याचा त्याच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नाही.

सलामीवीर अजिंक्य रहाणे ६२ धावांवर अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याआधी अजिंक्य रहाणेने संयमी अर्धशतक झळकावलं . कमिन्सच्या गोलंदाजीवर चौकार लगावत रहाणेने आपलं अर्धशतक झळकावलं. शिखर धवनच्या सहाय्याने अजिंक्यने भारताच्या डावाची भक्कम सुरुवात करुन दिली. या दोघांनीही भारतीय संघाला शतकी भागीदारी करुन दिली आहे. ७८ चेंडूंमध्ये ६२ धावा केलेल्या रहाणेने आपल्या खेळीत ८ खणखणीत चौकार लगावले. सुरुवातीचा काही वेळ खेळपट्टीवर चाचपडणाऱ्या अजिंक्य रहाणाने नंतर चांगलीच फटकेबाजी केली. स्ट्रेट ड्राईव्ह, स्क्वेअर कट सारखे आपल्या ठेवणीतले फटके लगावत अजिंक्यने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले.

वेस्ट इंडिजकडून देवेंद्र बिशू आणि अल्झारी जोसेफ आणि कर्णधार जेसन होल्डर या तीन गोलंदाजांना यश मिळालं.  युवराज सिंहच्या विकेटमुळे भारतीय फलंदाजांवर काहीसा अंकुश लावण्यात वेस्ट इंडिजचे गोलंदाज सफल झाले. त्यामुळे भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. त्यातच पावसाने पहिल्या सामन्यावर पाणी फिरवल्यामुळे पुढच्या सामन्यात कोण बाजी मारणार हे पहावं लागेल.

  • मुसळधार पावसामुळे सामना रद्द करण्याचा पंचांचा निर्णय
  • सामन्यात पावसाचा व्यत्यय, खेळ थांबवला
  • युवराज सिंहकडून पुन्हा निराशा, अवघ्या ४ धावा काढून युवी माघारी
  • देवेंद्र बिशूच्या गोलंदाजीवर शतकाच्या जवळ आलेला शिखर धवन माघारी
  • पहिली जोडी फोडण्यात वेस्ट इंडिजला यश, अजिंक्य रहाणे ६२ धावांवर बाद
  • जोसेफच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत शिखर धवनचही दमदार अर्धशतक
  • अजिंक्य रहाणेचं संयमी अर्धशतक
  • वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची निष्प्रभ गोलंदाजी
  • अजिंक्य रहाणे-शिखर धवनकडून भारताच्या डावाची सावध सुरुवात