केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्या यांची बहारदार फलंदाजी आणि गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्यामुळे भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर कर्णधार विराट कोहली आपल्या संघसहकाऱ्यांवर विशेषत: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि धोनीवर भलताच खूश आहे. तडाखेबंद अर्धशतकी खेळी करणाऱ्या हार्दिकचे त्याने तोंडभरुन कौतुक केले आहे.

हार्दिक पांड्याने फलंदाजी आणि गोलंदाजीतही उल्लेखनीय कामगिरी केली. ६६ चेंडूंमध्ये त्याने ८३ धावा कुटल्या. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ आणि हेड या दोघांनाही तंबूत धाडले. त्याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीने भारताने विजयी सुरुवात केली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० ने आघाडी मिळवली. पांड्या आणि धोनीच्या जिगरबाज खेळीने कर्णधार विराट खूपच खूश झाला आहे. त्याने पांड्या आणि धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला. पांड्यामध्ये आत्मविश्वास ठासून भरला आहे. तो खरोखरच “गेम चेंजर” आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही तो चांगली कामगिरी करतोय. त्याच्यासारखा खेळाडू संघात असणे हे आमच्यासाठी भाग्याचे आहे, असे विराट म्हणाला.

ऑस्ट्रेलियाच्या कल्टर नाईलने केलेल्या तिखट माऱ्यामुळे भारताची अवस्था बिकट झाली. रहाणे, विराट आणि मनोज पांडे झटपट बाद झाले. रोहित आणि केदार जाधवने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही अधिक काळ तग धरता आला नाही. ८७ धावांत ५ फलंदाज तंबूत परतले होते. पांड्या आणि धोनी (७९) यांनी ११८ धावांची भागिदारी करून भारताला २८१ धावांपर्यंत मजल मारून दिली.

पावसामुळे ऑस्ट्रेलियाला २१ षटकांत १६४ धावांचे लक्ष्य दिले. पण भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला रोखले आणि २६ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चांगली धावसंख्या उभारू असे मी नाणेफेकीवेळी म्हणालो होतो, पण अपेक्षित सुरुवात झाली नाही. आघाडीचे शिलेदार झटपट बाद झाले. कठिण परिस्थितीत मिळालेला विजय आनंद देणारा आहे. केदार आणि धोनीने चांगला खेळ केला. त्यानंतर पांड्या आणि धोनीने डावाचा नेहमीच्याच खास शैलीने समारोप केला, असे कोहली म्हणाला.