वेगवान गोलंदाज जोश हॅझलवूडने पदार्पण जोशात साजरे केले. उजव्या यष्टीवर टिच्चून मारा करीत त्याने दुसऱ्या नव्या चेंडूचाही खुबीने वापर केला. भारताच्या उर्वरित फलंदाजांनी गुरुवारी हॅझलवूडच्या गोलंदाजीवर हाराकिरी पत्करली. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याची भारताची नामी संधी हुकली. त्यानंतर उमेश यादवने तितक्याच आत्मविश्वासाने पुनरागमन केले. दुसऱ्या दिवसअखेर दुसरी कसोटी संतुलित अवस्थेत आहे.
भारताने ४ बाद ३११ धावसंख्येवरून गुरुवारी आपल्या डावाला पुढे प्रारंभ केला. परंतु १०९.४ षटकांत ४०८ धावांवर तो आटोपला. गुरुवारी भारताच्या सहा फलंदाजांनी फक्त ९७ धावांची भर घातली. ऑस्ट्रेलियाच्या हेझलवूडने ६८ धावांत ५ बळी घेत आपले पदार्पण जोशात साजरे केले. सुरुवातीच्या काही धक्क्यांतून सावरत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५२ षटकांत ४ बाद २२१ धावा केल्या आहेत. खराब सूर्यप्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर संपवण्यात आला. सामन्याचे तीन दिवस अद्याप बाकी असून यजमान संघ भारताच्या धावसंख्येपासून १८७ धावांनी पिछाडीवर आहे.
कर्णधार स्टीव्ह स्मिथ ६५ धावांवर खेळत असून, त्याने ८८ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह ही खेळी साकारली आहे; तर मिचेल मार्श ७ धावांवर खेळत आहे.
सलामीवीर ख्रिस रॉजर्सला सूर गवसला असून, त्याने ७९ चेंडूंत १० चौकारांनिशी ५५ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर (२९), शेन वॉटसन (२५) आणि शॉन मार्श (३२) या तिघांनी प्रारंभ चांगला केला, परंतु मोठी खेळी उभारण्यात ते अपयशी ठरले.
२०१२ नंतर प्रथमच कसोटी पुनरागमन करणाऱ्या उमेश यादवने आपल्या गोलंदाजीने लक्ष वेधून घेतले. त्याने ४८ धावांत ३ बळी घेतले, तर ऑफ स्पिनर आर. अश्विनला एक बळी मिळाला.
तत्पूर्वी, पहिल्या दिवशी सात षटके कमी टाकली गेली होती, तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी नियोजित वेळेत सामन्याला सुरुवात झाली. अजिंक्य रहाणे (८१) आणि रोहित शर्मा (३२) यांनी पाचव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी रचली. मग महेंद्रसिंग धोनी (३३) आणि आर. अश्विन (३५) यांनी ५७ धावांची भागीदारी करीत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर यादव, वरुण आरोन आणि इशांत शर्मा यांनी फक्त हजेरी लावली.
पहिल्याच सामन्यात पाच बळी मिळाल्याने आत्मविश्वास दुणावला आहे. पदार्पणाआधी शेफील्ड शील्डमधील एकमेव सामन्यात सराव चांगला झाला. कुटुंबीयांच्या साक्षीने ‘बॅगी ग्रीन कॅप’ स्वीकारण्याचा क्षण अनमोल होता. पहिल्या दिवशी उष्णतेचा मला त्रास झाला. उपाय म्हणून रात्रभरात मोठय़ा प्रमाणावर ऊर्जासंवर्धक द्रवपदार्थाच्या सेवनावर भर दिला. कसोटी क्रिकेटमध्ये परिस्थितीशी जुळवून घेणे आवश्यक असते.
– जोश हेझलवूड
सामन्यात याक्षणी आम्ही वरचढ स्थितीत आहोत. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात आम्ही सर्वोत्तम खेळ केला तर आगेकूच करू शकतो. आम्ही आणखी धावा करायला हव्या होत्या. मी ज्या पद्धतीने बाद झालो ते निराशाजनक होते. आम्ही ४०० धावा केल्या आहेत. मात्र आणखी धावा असत्या तर गोलंदाजांना सोपे झाले असते.
-रविचंद्रन अश्विन

हॅडिनची यष्टीरक्षणाच्या विक्रमाची बरोबरी
ब्रिस्बेन : ब्रिस्बेन कसोटीच्या भारताच्या पहिल्या डावात सहा झेल टीपून ब्रॅड हॅडिनने वॉली ग्राऊट, रॉड मार्श आणि इयान हिली या ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकांच्या विक्रमाची बरोबरी केली. नॅथन लिऑनच्या गोलंदाजीवर वरुण आरोनचा कठीण झेल हॅडिनला टिपता आला नाही. अन्यथा त्याला विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची संधी होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सात बळींचा विक्रम वासिम बारी (पाकिस्तान), रॉबर्ट टेलर (इंग्लंड), इयान स्मिथ (न्यूझीलंड) आणि रिडले जेकब्स (वेस्ट इंडिज) यांच्या नावावर आहे.

धावफलक
भारत (पहिला डाव) : (४ बाद ३११वरून पुढे) अजिंक्य रहाणे झे. हॅडिन गो. हॅझलवूड ८१, रोहित शर्मा झे. स्मिथ गो. वॉटसन ३२, महेंद्रसिंग धोनी झे. हॅडिन गो. हॅझलवूड ३३, रविचंद्रन अश्विन झे. वॉटसन गो. हॅझलवूड ३५, उमेश यादव झे. रॉजर्स गो. लिऑन ९, वरुण आरोन झे. बदली गो. लिऑन ४, इशांत शर्मा नाबाद १, अवांतर (बाइज ४, लेगबाइज १, वाइड २, नोबॉल १) ८, एकूण १०९.४ षटकांत सर्व बाद ४०८.
बाद क्रम : १-५६, २-१००, ३-१३७, ४-२६१, ५-३२१, ६-३२८, ७-३८५, ८-३९४, ९-४०७, १०-४०८
गोलंदाजी : मिचेल जॉन्सन २१-४-८१-०, जोश हॅझलवूड २३.२-६-६८-५, मिचेल स्टार्क १७-१-८३-०, मिचेल मार्श ६-१-१४-१, नॅथन लिऑन २५.४-२-१०५-३, शेन वॉटसन १४.४-६-३९-१, डेव्हिड वॉर्नर १-०-९-०, स्टीव्ह स्मिथ १-०-४-०.
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ख्रिस रॉजर्स झे. धोनी गो. यादव ५५, डेव्हिड वॉर्नर झे. अश्विन गो. यादव २९, शेन वॉटसन झे. धवन गो. अश्विन २५, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे ६५, शॉन मार्श झे. अश्विन गो. यादव ३२, मिचेल मार्श खेळत आहे ७, अवांतर (लेगबाइज १, वाइड ३, नोबॉल ४) ८, एकूण ५२ षटकांत ४ बाद २२१.
बाद क्रम : १-४७, २-९८,
३-१२१, ४-२०८
गोलंदाजी : इशांत शर्मा ९-०-४७-०, वरुण आरोन १२-१-५९-०, उमेश यादव १३-२-४८-३, आर. अश्विन १८-३-६६-१.