महेश भूपतीच्या डोक्यातून साकारलेल्या इंडियन टेनिस लीग स्पर्धेविषयी महिला टेनिस असोसिएशन (डब्ल्यूटीए) अनभिज्ञ आहे. ही स्पर्धा कशी होईल, याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. टेनिसचाहते आणि प्रसारमाध्यमे या स्पर्धेबाबत जशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, तसाच प्रयत्न आमचा सुरू आहे, असे डब्ल्यूटीएच्या आशियातील उपाध्यक्ष मेलिसा पाइन्स म्हणाल्या.
दुबईत गेल्या आठवडय़ात इंडियन टेनिस लीगची घोषणा करण्यात आली. सेरेना विल्यम्स, व्हिक्टोरिया अझारेंका, अ‍ॅना इव्हानोव्हिक, कॅरोलिन वोझ्नियाकी, डॅनियला हन्तुचोव्हा, मार्टिना हिंगीस आणि सानिया मिर्झा यांसारख्या अव्वल महिला टेनिसपटू या स्पर्धेसाठी करारबद्ध झाल्या आहेत. या स्पर्धेविषयी पाइन्स म्हणाल्या की, ‘‘टेनिसपटूंनी प्रदर्शनीय सामने खेळावेत, असे मला वाटते. पण त्याचबरोबर टेनिसपटूंनी व्यावसायिक टेनिस आणि आर्थिक गरजा यांचा योग्य ताळमेळ साधण्याचीही गरज आहे. टेनिसपटूंनी येत्या मोसमासाठी शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त राहण्याची आवश्यकता आहे.’’
‘‘या स्पर्धेविषयी आमच्याकडे कोणतीही ठोस माहिती नाही. प्रसारमाध्यमांच्या वृत्तावरूनच आम्ही या स्पर्धेविषयी जाणून घेत आहोत. भारतात महिला टेनिसचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डब्ल्यूटीए प्रयत्नशील आहे. सानिया मिर्झा, ली ना, पेंग शुआई यांसारख्या महिला टेनिसपटू पुढे आल्यामुळे आशिया खंडात डब्ल्यूटीएचा प्रसार करण्याची हीच योग्य वेळ आहे.’’
आंतरराष्ट्रीय टेनिसचा मोसम संपल्यानंतर इंडियन टेनिस लीग स्पर्धा २७ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे सामने बँकॉक, मुंबई, सिंगापूर आणि दुबई येथे खेळवण्यात येतील.