बीजिंग येथे २००८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या २३ खेळाडूंसह आणखी ४५ खेळाडू उत्तेजकाबाबत दोषी असल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हटले आहे. या खेळाडूंच्या नमुन्यांची पुन्हा तपासणी केल्यानंतर हे निष्पन्न झाले आहे.

बीजिंग (२००८) व लंडन (२०१२) येथे झालेल्या ऑलिम्पिकचे वेळी दोषी आढळलेल्या खेळाडूंची संख्या ९८ वर पोहोचली आहे. अद्ययावत तपासणी पद्धतीद्वारे केलेल्या तपासणीनंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र कोणते खेळाडू दोषी आहेत याचा तपशील अद्याप गुलदस्त्यातच आहे. खेळाडूंच्या रक्त व लघवीचे नमुने दहा वर्षांपर्यंत ठेवण्याची व्यवस्था आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने केली आहे. उत्तेजक घेतलेले जे खेळाडू त्या स्पर्धेच्या वेळी सुटले आहेत, असे खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आहेत की नाही हे आताही कळू शकणार आहे. अशा खेळाडूंवर रिओ येथील ऑलिम्पिक स्पर्धेत बंदी घालण्याची शक्यता आयओसीने व्यक्त केली आहे.

आयओसीने सुरुवातीला घेतलेल्या चाचणीच्या आधारे बीजिंग येथील स्पर्धेत तीस खेळाडू व लंडन येथील स्पर्धेतील २२ खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळले होते. त्यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या रशियन खेळाडूंचा समावेश आहे. रशियासह आठ देशांचे खेळाडू दोषी आढळले आहेत. नव्याने केलेल्या चाचणीच्या आधारे लंडन ऑलिम्पिकमधील पंधरा खेळाडू दोषी आढळले आहेत. खेळाडूंची नावे संबंधित देशांच्या ऑलिम्पिक महासंघांकडे देण्यात आली आहेत, असे आयओसीने म्हटले आहे.

 

रशियावरील बंदीबाबत रविवारी आयओसीची बैठक

पीटीआय, मॉन्ट्रियल

क्रीडा लवाद न्यायालयाने रशियन खेळाडूंची याचिका फेटाळल्यानंतर त्यांच्यावरील बंदीबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची (आयओसी) रविवारी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

रशियामध्ये उत्तेजकाबाबत दोषी आढळलेल्या खेळाडूंना पाठीशी घातले जात असल्याचा व त्यामध्ये तेथील संघटकांसह शासनाचाही अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने रशियन अ‍ॅथलेटिक्स महासंघाची संलग्नता स्थगित केली. साहजिकच त्यांच्या ६७ धावपटूंचा ऑलिम्पिकमधील सहभाग अनिश्चित झाला. या बंदीविरुद्ध या खेळाडूंनी क्रीडा लवादाकडे केलेला अर्ज फेटाळला आहे.

रशियाच्या सर्वच खेळाडूंना आगामी ऑलिम्पिकमध्ये सहभागी करू नये, अशी मागणी अमेरिका, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, फिनलंड, जपान यांच्यासह चौदा देशांनी केली आहे. या देशांच्या उत्तेजक प्रतिबंधक समितींनी एकत्रितरीत्या आयओसीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांना पत्र पाठविले आहे. ऑलिम्पिक चळवळीवरील विश्वास व स्पर्धाची प्रतिष्ठा राखण्यासाठी रशियन खेळाडूंवर बंदी घालणे योग्य होईल, असे या पत्रात नमूद केले आहे.