‘‘अंबाती रायुडू जेव्हा धावचीत झाला, तेव्हा १४.३ षटकांत दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत झाली होती. त्यामुळे नेमके कोण ‘प्ले-ऑफ’साठी पात्र ठरले हेच आम्हाला कळेना. आम्ही १४ किंवा १४.२ षटकांत जिंकू किंवा हरू असे वाटले होते, परंतु १४.३ षटकांत समान धावसंख्या होइल, असे कदापी वाटले नव्हते,’’ असे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितले.
‘‘मैदानावरील मोठय़ा स्क्रिनवर कोण आगेकूच करणार, याचे समीकरण दाखवण्यात आले, परंतु आमचे तिकडे लक्षच गेले नाही. मग आमच्या सांख्यिकीतज्ज्ञाने आम्हाला लक्षात आणून दिले की, पुढील चेंडूवर चौकार खेचल्यास धावगतीमध्ये आपण राजस्थान रॉयल्सपेक्षा पुढे जाऊ,’’ असे रोहितने सांगितले.
‘‘१४.३ षटकांत हे लक्ष्य आवाक्यात आणणे ही मुळीच सोपी गोष्ट नव्हती. पहिल्या षटकापासून १३हून अधिक धावांची सरासरी राखण्याची आवश्यकता होती. १९०चे लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही अजिबात दडपण न घेता खेळाचा यथेच्छ आनंद लुटण्याचे धोरण स्वीकारले. कोरे अँडरसन हा अतिरिक्त फलंदाज संघात होता आणि आमची फलंदाजीची फळीसुद्धा खंबीर असल्याने हे आव्हान आम्ही पेलू, याची जाणीव होती,’’ असे रोहित यावेळी म्हणाला.
केव्हॉन कूपरवर संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीचा ठपका
मुंबई : राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज केव्हॉन कूपरच्या गोलंदाजीच्या शैलीबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याने मुंबई इंडियनविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टाकलेल्या काही चेंडूंची शैली बेकायदेशीर असल्याचा अहवाल सामन्याचे पंच रॉड टुकर व के.श्रीनाथ यांनी तिसरे पंच एस.रवी यांच्याशी सल्लामसलत करीत दिला आहे. त्यांच्या अहवालाच्या आधारे त्याच्या गोलंदाजीची छाननी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या संबंधित समितीद्वारे केली जाणार आहे.