मुंबई कसोटीसाठी मुरलीसोबत पुन्हा पार्थिववर विश्वास

उत्तम सलामीची भागीदारी, ही संघाच्या मोठय़ा धावसंख्येची पायाभरणी असते, असे क्रिकेटजगतात म्हटले जाते. मात्र बदलते सलामीवीर आणि तुटपुंज्या भागीदाऱ्या यांच्या बळावरसुद्धा विजय मिळवता येतो, हे भारताने सिद्ध केले आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्याविरुद्धच्या मागील सहा कसोटी सामन्यांत मुरली विजयला मालिकेतील प्रत्येक सामन्यात नवा साथीदार मिळाला. पण सलामीच्या चिंतेवर मात करूनही विजयश्री भारताला मिळाली. आता मोहालीतील दोन्ही डावांत सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या यष्टीरक्षक पार्थिव पटेलवरच मुंबईत पुन्हा विश्वास प्रकट करण्यात येणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-० असे निभ्रेळ यश मिळवले. त्यानंतर आता इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या मालिकेतील तीन सामन्यांअखेर भारताने २-० अशी आघाडी मिळवली आहे. न्यूझीलंडविरुद्ध ५२ धावांची आणि इंग्लंडविरुद्ध ६८ धावांची सर्वोच्च सलामी भारतीयांकडून साकारली आहे. या सहाही सामन्यांत मुरली विजय हा निश्चित सलामीवीर होता. त्याने दोन्ही मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली. मात्र पुढील दोन्ही सामन्यांत त्याला सातत्य राखता आले नाही. त्याची दोन्ही मालिकांमधील सरासरीसुद्धा समाधानकारक म्हणता येणार नाही. न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांत विजयने ३१च्या सरासरीने १८६ धावा केल्या, तर इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांत त्याने ३२च्या सरासरीने १९२ धावा केल्या. विजयबाबत भारताचे प्रशिक्षक अनिल कुंबळे म्हणाले, ‘‘दोन वेळा एकाच पद्धतीने बाद झाल्यामुळे आखूड टप्प्याच्या चेंडूंवर विजयची दैना होते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. सध्या अपेक्षित कामगिरी होत नसली, तरी तो भारताचा कसोटी क्रिकेटमधील महत्त्वाचा फलंदाज आहे.’’

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात लोकेश राहुलला दुखापत झाली. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने तिसऱ्या कसोटीसाठी दिल्लीचा जुनाजाणता सलामीवीर गौतम गंभीरला संघात स्थान देण्यात आले होते.

त्यानंतर इंग्लंडविरुद्ध मालिकेतील पहिल्या कसोटीकरिता धवन आणि राहुल दोघेही अनुपलब्ध झाल्याने राजकोट येथे गंभीरला आणखी एक संधी मिळाली. परंतु तिथे अपयशी ठरल्याने त्याची संघातून गच्छंती झाली. स्थानिक क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करीत राहुल पुन्हा संघात परतला. परंतु अपेक्षित सलामी तो देऊ शकला नाही. दुसऱ्या कसोटीत यष्टीरक्षक वृद्धिमान साहाच्या दुखापतीमुळे मोहालीतील तिसऱ्या कसोटीसाठी पार्थिव पटेलला आठ वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमनाची संधी मिळाली. सलामीवीर फलंदाज ही आणखी

एक खासियत जपणाऱ्या पार्थिववर कर्णधार आणि प्रशिक्षकाने विश्वास व्यक्त केला. त्याने सलामीला न्याय देत अनुक्रमे ४२ आणि ६७ धावा केल्या. त्यामुळेच मुंबईच्या कसोटीत सलामीची चिंता असतानाही पार्थिव मात्र निश्चितपणे सलामीला उतरणार आहे.

मोहालीत सलामीवीर फलंदाजीच्या जबाबदारीला न्याय देणाऱ्या पार्थिवचे कौतुक करताना कुंबळे म्हणाले, ‘‘आठ वर्षांनंतर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतानाही तो आत्मविश्वासाने खेळला. सलामी आणि यष्टीरक्षण या दोन्ही जबाबदाऱ्या तुला पेलाव्या लागतील, असे त्याला सांगण्यात आले होते. त्याने दोन्ही भूमिका यशस्वीपणे वठवल्या.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘पार्थिव १६-१७ वर्षांचा असताना भारतीय संघात आला होता. आतासुद्धा त्याने दाढी केली, तर तो सोळा वर्षांचाच वाटेल. परंतु त्याच्यातील परिपक्वता ही वाखाणण्याजोगी आहे. विश्वास ढळू न देता स्थानिक क्रिकेटमध्ये कामगिरी करीत राहाल, तर तुम्ही संघात पुनरागमन करू शकता, हेच त्याने दाखवून दिले.’’