गुवाहाटीच्या मैदानात भारतीय फलंदाजीला लगाम घालत ऑस्ट्रेलियाने टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात ऑस्ट्रेलिया ट्रेविस हेड आणि हेन्रिके या फलंदाजांसह बेहरनडॉर्फने गोलंदाजीत धार दाखवली. सामन्यानंतर भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीचे कौतुक केले. दुसऱ्या टी-२० सामन्यात बेहरनडॉर्फने भारताच्या आघाडीच्या फलंदाजीला सुरुंग लावाला होता. त्याने सलामीवीर रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली आणि मनिष पांडेला तंबूचा रस्ता दाखवला.

या सामन्याविषयी भूवी म्हणाला की, रोहित आणि विराट कोहली लवकर बाद झाल्यानंतर मधल्या फळीतीली फलंदाजांना डाव सावरण्यात अपयश आले. त्यामुळे आमची सामन्यावरील पकड सैल झाली. याशिवाय बेहरनडॉर्फने उत्कृष्ट गोलंदाजी केल्याचेही तो म्हणाला. गुवाहाटीची खेळपट्टी बेहरनडॉर्फसाठी अनुकूल होती. त्याने त्याचा पूरेपूर फायदा घेतला. गतीच्या बदलासह त्याने अचूक मारा केला. त्यामुळे तो चार विकेट्स मिळवण्यात यशस्वी ठरला. टी-२० सामन्यात अशी कामगिरी फार क्वचितच पाहायला मिळते, असेही त्याने सांगितले.

दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावर भुवनेश्वर म्हणाला, पाऊस झाल्यामुळे मैदानात ओलावा होता. याचा फायदा घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतला. सामन्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्यानंतर हा निर्णय त्यांना फायदेशीर ठरल्याचे सिद्ध झाले. भारताने दिलेल्या ११९ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला बुमराहने पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार वॉर्नरला अवघ्या २ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर भुवनेश्वरने अॅरोन फिंचला तंबूचा रस्ता दाखवला. यातून सावरत ट्रेविस हेड आणि हेन्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. भारत आणि ऑस्ट्रेलियी यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिका आता १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे आगामी सामना जिंकून दोन्ही संघ मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असतील.