राजस्थान रॉयल्स आणि भारत ‘अ’ संघाकडून खेळताना कर्नाटकचा महान फलंदाज राहुल द्रविडने मला योग्य आत्मविश्वास दिला, असे भारतीय संघात प्रथमच स्थान देण्यात आलेल्या करुण नायरने सांगितले.
‘‘द्रविडने माझ्या फलंदाजीला आत्मविश्वासाचे बळ दिले. नेहमी सकारात्मक पद्धतीने वावरणाऱ्या द्रविडने मला योग्य दिशा दिली. त्याने माझ्या फलंदाजीच्या तंत्रात बदल केला नाही, परंतु घडणाऱ्या वयात आवश्यक असलेला आत्मविश्वास मात्र नक्की दिला,’’ असे नायरने सांगितले.
‘‘द्रविड फारसा बोलत नाही. एखाद्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करीत नाही. तुम्ही आयुष्यभर जसे खेळत आलात, तसेच मोकळेपणाने खेळण्याचा सल्ला मात्र देतो,’’ अशा शब्दांत नायरने द्रविडचे कौतुक केले.
अन्य क्रिकेटपटूंप्रमाणेच भारतातर्फे खेळण्याचे स्वप्न बंगळुरूच्या २३ वर्षीय नायरने जोपासले होते. याबाबत तो म्हणाला, ‘‘प्रत्येक क्रिकेटपटूचे देशाकडून खेळण्याचे स्वप्न असते. माझे हेच स्वप्न सत्यात उतरले आहे. आता मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करायचे आहे.’’