मेराज शेखच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर इराणने उपांत्य फेरीत कोरियाला २८-२२ अशी धूळ चारली. तर भारताने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करीत थायलंडवर ७३-२० असा दणदणीत विजय प्राप्त केला.

द एरिना संकुलात झालेल्या पहिल्या सामन्यात इराणने सुरुवात छान केली. मग आठव्या मिनिटाला कोरियाने इराणवर पहिला लोण चढवला. या बळावर कोरियाने पहिल्या सत्रात १३-११ अशी आघाडी मिळवली होती. मात्र सत्रात इराणने आक्रमक पवित्रा स्वीकारत २२व्या मिनिटाला कोरियावर लोण चढवला. त्यानंतर हातातून निसटू पाहणारा सामना वाचवण्यासाठी यांग कुन लीने शर्थीने प्रयत्न केले. पण समर्थ बचावाच्या बळावर इराणने बाजी मारली.

दुसऱ्या सामन्यात भारताने सहाव्या मिनिटाला थायलंडवर पहिला लोण चढवला आणि मध्यंतरापर्यंत एकंदर तीन लोणसहित ३६-६ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर अखेरच्या मिनिटापर्यंत भारताचेच वर्चस्व दिसून आले. दुसऱ्या सत्रात भारताने आणखी तीन लोण चढवले. प्रदीप नरवाल (१४ गुण),अजय ठाकूर (११ गुण) आणि नितीन तोमर (७ गुण) यांच्या चढायांनी भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.