विराट कोहलीचे तंत्रकौशल्य अतिशय घोटीव आहे. म्हणूनच कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकारात सातत्याने धावा करतो आहे. आताच्या पिढीतल्या क्रिकेटपटूंमध्ये विराट परिपूर्ण असा फलंदाज आहे, असे उद्गार भारताचा माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने काढले. दिलीप सरदेसाई स्मृती व्याख्यानमालेत यंदा लक्ष्मणला आमंत्रित करण्यात आले होते.

‘विराटला स्वत:ची ताकद आणि कच्चे दुवे अचूकपणे ठाऊक आहेत. कच्चे दुवे बळकट करण्याचा तो सातत्याने प्रयत्न करतो. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२०प्रमाणे कसोटीतही त्याची सरासरी होईल आणि तो सर्व विक्रम मोडीत काढेल’, असा विश्वास लक्ष्मणने व्यक्त केला. ‘लोकेश राहुलच्या जडणघडणीत विराटची भूमिका निर्णायक आहे. विराटने राहुलला नैसर्गिक खेळ करण्याची मुभा दिली आणि त्याचा खेळ बहरला’, असे लक्ष्मणने सांगितले.

विराटप्रमाणेच अश्विनलाही लक्ष्मणने शाबासकी दिली. आताच्या घडीला जगातल्या सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये अश्विनचा समावेश होतो. कोणताही खेळाडू महान होण्यासाठी संघाच्या विजयात त्याचे योगदान महत्त्वाचे असते. गेल्या चार वर्षांतील भारतीय संघाच्या विजयी वाटचालीत त्याचा सिंहाचा वाटा आहे. खेळाडू म्हणून साचलेपण यायला नको. अश्विन विचारी खेळाडू आहे. एकहाती सामना जिंकून देण्याची त्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे.

गुलाबी चेंडूच्या प्रयोगाविषयी विचारले असता लक्ष्मण म्हणाला, ‘भारतात दवाचा मुद्दा कळीचा ठरतो. चेंडूचा कणखरपणा आणि चमक गमवायला नको’.