भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असला तरी मायभूमीतच कोहली ब्रिगेडवर मात करण्यासाठी केलेल्या तयारीचे दर्शन पुणे कसोटीच्या दुसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाच्या खेळीतून दिसून आले.  ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर भारतीय ंफलंदाजांची दाणादाण उडाली. इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध सहाशे धावांपर्यंत मजल मारणाऱया भारतीय संघाचा डाव ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अवघ्या १०५ धावांत संपुष्टात आणला. ऑस्ट्रेलियाच्या भात्यातील स्टीफन ओ’केफी या फिरकी अस्त्राने भारताचे फलंदाज पूर्णपणे घायाळ झाले. ओ’केफीने केवळ ३३ धावांमध्ये ६ बळी घेतले. तर मिचेल स्टार्कने भारताच्या पुजारा आणि कोहली या दोन महत्त्वाच्या फंलदाजांना तंबूत दाखल केले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावात भारताकडून आर.अश्विननेही जशास तसे प्रत्युत्तर देत तीन विकेट्स घेतल्या. पण कर्णधार स्टीव्हन स्मिथने मैदानात जम बसवून अर्धशतकी खेळी साकारली. दुसऱया दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४ बाद १४३ अशी असून ऑस्ट्रेलियाने २९८ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.

भारताचा डाव १०५ धावांत संपुष्टात आणल्यानंतर ऑस्ट्रेलियाचेही दुसऱया दिवसाच्या अखेरीस चार विकेट्स पडले आहेत. ऑस्ट्रेलियाकडे आता २९८ धावांची आघाडी आहे. पुण्याच्या खेळपट्टीने आपले खरे रुप दाखवण्यास सामन्याच्या दुसऱयाच दिवसापासून सुरूवात केल्याने तिसऱयाच दिवशी सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाची स्थिती ९ बाद २५६ अशी होती. त्यानंतर दुसऱया दिवसाच्या सुरूवातीलाच अश्विनने मिचेल स्टार्कला बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव २६० धावांमध्ये संपुष्टात आणला.
मात्र, प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी निराशा केली. भारतीय संघाने शंभरचा आकडा देखील गाठला नाही आणि सात फलंदाज तंबूत दाखल झाले होते. भारतीय फलंदाजांना अगदी नाहक विकेट्स टाकणे महागात पडले आहे. अगदी सातव्या षटकातच भारताला पहिला धक्का बसला होता. मुरली विजय झेलबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर पुजारा आणि केएल राहुल यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.पण पुजारा देखील स्वस्तात बाद झाला. पुजारा तंबूत दाखल झाल्यानंतर पहिल्याच चेंडूवर कर्णधार कोहलीला मिचेल स्टार्कने माघारी धाडले. उपहारापर्यंत भारताची अवस्था तीन बाद ७० धावा अशी होती.

 

दुसऱया सत्रात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू स्टीफन ओ’केफी याने कमाल केली. सामन्याच्या ३३ व्या षटकात ओ’केफी याने भारताच्या तीन फलंदाजांना चालते केले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात केएल राहुल (६४) झेलबाद झाला. त्यानंतर रहाणे स्लिपमध्ये झेलबाद झाला. पाठोपाठ आर.अश्विन(१) शॉर्ट लेगवर झेलबाद झाला. जयंत यादवचा(०) यष्टीरक्षक पीटर हँड्सकोम्ब अप्रतिम स्टम्पिंग घेतला आहे. दुसऱया सत्रात भारत पूर्णपणे बॅकफूटवर आला. कांगारुंनी भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. ओ’केफेला चांगला सुर गवसल्याचे दिसत असतानाही जडेजाने मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट दिली. अखेरीस उमेश यादवलाही स्वस्तात बाद करून ओ’केफेने ३३ धावांत ६ विकेट्स घेण्याची त्याची सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. ऑस्ट्रेलियाकडे आता १५५ धावांची आघाडी आहे.

तत्पूर्वी, कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. उमेश यादवने चार बळी घेत ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण केला होता. तर फिरकीपटू अश्विनने तीन आणि जडेजाने दोन फलंदाजांना माघारी धाडले. मॅट रेनशॉचे झुंजार अर्धशतक तर मिचेल स्टार्कची झंझावती फलंदाजी यामुळेच ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ९४ षटकांत ९ बाद २५६ अशी धावसंख्या रचता आली. मात्र कसोटीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या चाहत्यांची काही अंशी निराशाच झाली. गहुंजे येथील मैदानावर हा पहिलाच कसोटी सामना असल्याने खेळपट्टीचा स्वभाव कसा राहील, याचीच उत्कंठा होती. रेनशॉ (६८) व स्टार्क (नाबाद ५७) यांच्या आत्मविश्वासपूर्ण खेळाचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचे अन्य फलंदाज खेळपट्टीचे दडपण घेत बाद झाले.

पहिला बळी मिळवण्यासाठी भारताला २८व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली आणि हा बळीदेखील उमेशने मिळवून दिला. त्याने डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा उडवला. रेनशॉ व वॉर्नर यांनी ८२ धावांची सलामी दिली. वॉर्नरने सहा चौकारांसह ३८ धावा केल्या. खेळपट्टीवर काही ठिकाणी चेंडू झटकन वळत होता तर काही ठिकाणी चेंडू अनपेक्षितरीत्या उसळी घेत होता. ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी फिरकीचा धसका घेतच फलंदाजी केली. त्यामुळेच त्यांना अपेक्षेइतकी मोठी धावसंख्या रचता आली नव्हती.