आठवडय़ाची मुलाखत : अतुल आंब्रे, शरीरसौष्ठवपटू

‘‘हा शरीरसौष्ठवाचा नाद सोडून दे, हे काही आपल्याला परवडणारं नाही,’’ असं त्याचं कुटुंब त्याला सांगत होतं. वडील सेनादलात सुभेदार होते, निवृत्तीनंतर ते खासगी कंपनीत सुरक्षारक्षकाचं काम करतात. ते एकटेच कमावते असल्याने घरची परिस्थिती बिकट. त्यात तो भावंडांमध्ये थोरला, त्यामुळे घर चालवायचं ओझं होतंच. पण या शरीरसौष्ठवाच्या छंदानं जिवाला पिसं लावलं होतं. गुणवत्तेवर विश्वास होता, अथक मेहनत घ्यायची तयारी होती. जिद्द, जिंकण्याची ईर्षां होतीच. पण मार्ग सापडत नव्हता. अखेर त्याला आयुष्यात दोन अशा व्यक्ती भेटल्या की त्यांच्यामुळे त्याचं हे शरीरसौष्ठवाचं वेड सत्यात उतरलं आणि ‘मुंबई-श्री’ स्पर्धेत उतरून त्याने एकहाती जेतेपदाला गवसणी घातली. २३ वर्षीय अतुल आंब्रे ‘मुंबई-श्री’ स्पर्धा जिंकल्यावर आतापर्यंतची परिस्थिती, घरच्यांचा विरोध, जेतेपदाची तयारी, स्वप्न साकारल्याचा आनंद आणि पुढील ध्येय याविषयी भरभरून बोलला. आर्थिक स्थैर्य मिळालं, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उंचावू शकतो. पण जर नोकरी नसेल तर यापुढचा मार्गही कठीण असेल, असं त्यानं प्रामाणिकपणे सांगितलं. नव्या विजेत्या अतुलशी केलेली खास बातचीत-

  • ‘मुंबई-श्री’ जिंकल्यावर काय भावना आहे?

नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. हे मेहनतीचं फळ आहे. गेल्या वर्षी माझी एक शस्त्रक्रिया झाली होती. डॉक्टरांनी एक वर्ष विश्रांती घ्यायला सांगितलं होतं. पण शरीरसौष्ठवाचं वेड स्वस्थ बसू देत नव्हतं. वर्ष वाया जाऊ नये, म्हणून स्पर्धेत भाग घेण्याचं ठरवलं. स्पर्धेसाठी अथक मेहनत घेतली आणि जेतेपदाचं स्वप्न साकार झालं.

  • गेल्या चार महिन्यांपूर्वी तुझं शरीर स्पर्धेसाठी तयार नव्हतं. या चार महिन्यांत नेमकी काय मेहनत घेतली?

चार महिन्यांत स्पर्धेसाठीचं शरीर बनवणं सोपं नसतं. पण संजय चव्हाण यांनी माझ्यावर जी मेहनत घेतली, त्याचंच हे फळ आहे. सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय खायला हवं, काय व्यायाम करायला हवा, हे त्यांनी सांगितलं. अगदी लहानसहान गोष्टीही त्यांनी मला समजून सांगितल्या. दिवसभरात कधी, केव्हा, किती पाणी प्यायचं, काय आहार घ्यायचा, व्यायाम कधी आणि कसा करायचा, हे गेल्या चार महिन्यांमध्ये त्यांनी मला सांगितलं. हे जेतेपद माझ्यापेक्षा जास्त त्यांचंच आहे.

  • शरीरसौष्ठवाच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगशील?

सातव्या वर्षांपासून मी व्यायामाला सुरुवात केली. शरीर चांगली साथ देत होतं. त्यामुळे शरीरसौष्ठव करावं, हे मी मनाशी ठरवलं. पण घरच्यांचा विरोध होता. कारण शरीरसौष्ठवपटू बनण्यासाठी जेवढे पैसे लागतात, तेवढे आमच्याकडे नव्हते. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे त्यांचं म्हणणं चुकीचं नव्हतं. पण मी मात्र मनाशी खूणगाठ बांधली होती की, याच खेळात नाव कमवायचं. त्यामुळे स्थानिक स्पर्धापासून ते ज्युनिअर गटाच्या मुंबई आणि महाराष्ट्र या स्पर्धामध्ये चांगली कामगिरी झाली होती. आता ‘मुंबई-श्री’ स्पर्धेत विजयी झालो.

  • घरची परिस्थिती बेताची असताना खर्चाचा डोलारा कसा सांभाळला ?

शरीरसौष्ठव खेळ म्हटला की आहार चांगला आणि जास्त असावा लागतो. त्यामुळे महिन्याला साधारण ४०-५० हजार रुपयांचा खर्च होतो. मी सध्या एका व्यायामशाळेत प्रशिक्षकाचं काम करतो. या व्यायामशाळेतील सुजित नलावडे यांना माझी परिस्थिती समजली आणि त्यांनी मला शरीरसौष्ठवासाठी अर्थसाहाय्य केलं. त्यांच्या या मदतीच्या आधारामुळेच मला जेतेपदाच्या स्पर्धेपर्यंत पोहोचता आलं. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे ते मला कठीण होतं. पण यापुढे जर मला शरीरसौष्ठवात मोठी मजल गाठायची असेल तर नोकरीची नितांत गरज आहे. याचप्रमाणे घर चालवायलाही त्यामुळे हातभार लागेल.

  • यापुढे काय ध्येय तू ठेवलं आहेस?

आता मला राष्ट्रीय स्पर्धेचे वेध लागले आहेत. त्यासाठी मी तयारीला लागलो आहे. त्यानंतर दोन वर्षांमध्ये मला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचं आहे. देशाचं नाव उंचावण्याचं स्वप्न तर आहेच, पण जर आर्थिक पाठबळ नसेल तर मला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणं कठीण वाटतं.

अतुल आंब्रे ‘मुंबई-श्री’

मुंबई : तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले, याचा प्रत्यय आला तो ‘मुंबई-श्री’ या स्पर्धेच्या निमित्ताने. ही स्पर्धा अटीतटीची होईल, असे चाहत्यांना सुरुवातीला वाटत होते. पण जेव्हा ८५ किलोवरील वजनी गटातील शरीरसौष्ठवपटू रंगमंचावर आले तेव्हा ही स्पर्धा एकतर्फीच होणार, हे साऱ्यांना समजून चुकले. कारण या गटातील अतुल आंब्रे हा रंगमंचावर आला, तेव्हा त्याचे शरीरसौष्ठव पाहून सारेच थक्क झाले आणि निर्विवादपणे अतुलने मुंबई उपनगर शरीरसौष्ठव असोसिएशन व बृहन्मुंबई शरीरासौष्ठवपटू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘मुंबई-श्री’ या स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली.

अतुलने ज्युनिअर मुंबई आणि महाराष्ट्र या स्पर्धामध्ये दमदार कामगिरी केली होती. पण गेल्या दोन वर्षांमध्ये तो कोणत्याही स्पर्धामध्ये खेळलाच नव्हता. त्यानंतर दोन वर्षांमध्ये दमदार पुनरागमन करत त्याने एकहाती जेतेपद पटकावले. या वेळी विलास घडवले उपविजेता ठरला तर सकिंदर सिंगला प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटूचा पुरस्कार देण्यात आला.

निकाल –

  • ५५ किलो वजनी गट : १. सिद्धेश सकपाळ, २. नितीन शिगवण, ३. देवचंद गावडे; ६० किलो : १. उमेश गुप्ता, २. तेजस भालेकर, ३. उमेश पांचाळ; ६५ किलो : १. बप्पन दास, २. सिद्धेश धनावडे, ३. प्रदीप झोर; ७० किलो : १. विलास घडवले, २. प्रतीक पांचाळ, ३. विकास सकपाळ; ७५ किलो : १. सौरभ साळुंखे, २. सुशील मुरकर, ३. संतोष भरणकर;  ८० किलो : १. सुशांत रांजणकर, २. स्वप्निल मांडवकर, ३. रमेश दिब्रिटो; ८५ किलो : १. सकिंदर सिंग, २. देवेंद्र वणगेकर, ३. मयूर घरत; ८५ किलोवरील : १. अतुल आंब्रे, २. नीलेश दगडे, ३. अरुण नेवरेकर.