एका खेळाच्या अनेक संघटनांमुळे महाराष्ट्रातील खेळाडूंचा अपेक्षेइतका विकास होत नाही, तसेच अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धापासून वंचित राहावे लागते, हे लक्षात घेऊनच महाराष्ट्र लिम्पिक संघटनेने (एमओए) यंदा ‘एक खेळ, एक संघटना’ यावर भर देण्याचे ठरवले आहे. ‘एमओए’च्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच निवडणूक झाली. या समितीतील नव्या कार्यकारिणीची शनिवारी अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी महत्त्वपूर्ण गोष्टींवर चर्चा केली.

या बैठकीत आगामी चार वर्षांच्या कालावधीतील नवीन उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात अनेक खेळांमध्ये दोन ते तीन संघटना समांतर स्तरावर कार्यरत आहेत. त्यामुळे आपण कोणत्या संघटनेचे संलग्नत्व घ्यावयाचे याबाबत खेळाडूंमध्ये संभ्रम निर्माण होत असतो. विशेषत: राष्ट्रीय स्तरावरील संघटनांशी या संघटना संलग्न नसतील तर अशा खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होताना अनेक अडचणी येत असतात. हे लक्षात घेऊनच प्रत्येक खेळात एकच अधिकृत संघटना कार्यरत राहील याकडे लक्ष दिले जाणार आहे. त्या दृष्टीने सर्वच समांतर संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर ‘एमओए’ सविस्तर चर्चा करणार आहे. सन्मान्य तडजोड करण्यावरही भर दिला जाईल. त्याबाबत एक श्वेतपत्रिकाही काढली जाणार आहे.

क्रीडा क्षेत्रात झपाटय़ाने बदल होत आहेत. एमओएच्या घटनेतील अनेक नियम कालबाह्य़ झाले असून त्यामध्ये बदल करावयाची आवश्यकता आहे, असे मत कार्यकारिणीतील काही सदस्यांनी व्यक्त केले. घटनादुरुस्ती करण्यावर एकमत झाले व ती दुरुस्ती करण्याबाबत खेळाडू, प्रशिक्षक, कार्यकर्ते, संघटक व अन्य संघटना आदी विविध घटकांशी चर्चा करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.

शिवछत्रपती क्रीडानगरीत ऑलिम्पिक भवन उभारण्यासाठी ‘एमओए’ने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे तसेच केरळमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना रोख पारितोषिके देण्याबाबतही एमओएने शासनाकडे पत्र पाठविले होते.