माटाच्या गोलमुळे सिटी पराभूत; वेस्ट हॅमचा चेल्सीला धक्का

जुआन माटाने दुसऱ्या सत्रात केलेल्या गोलच्या जोराववर मँचेस्टर युनायटेडने गतविजेत्या मँचेस्टर सिटीचा १-० असा पराभव करून इंग्लिश फुटबॉल लीग चषक स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या लढतीत वेस्ट हॅम युनायटेडने बलाढय़ चेल्सीवर २-१ असा विजय मिळवून धक्कादायक निकालाची नोंद केली.

जोस मॉरिन्हो यांच्या युनायटेड क्लबला चेल्सीकडून ०-४ असा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता, तसेच गत महिन्यात सिटीकडून झालेल्या पराभवाचा वचपा युनायटेडने घेतला.

‘‘दिमाखदार प्रदर्शनासह विजयाचे सक्षम दावेदार असल्याचे खेळाडूंनी सिद्ध केले. गत आठवडय़ात सर्व  आमच्या विरोधात होत, परंतु आम्ही व्यावसायिक आहोत. नकारात्मक निकालामुळे चाहतेही निराश होता आणि आज ही निराशा दूर करण्याची संधी होती. उपांत्यपुर्व फेरीतील प्रवेश आणि हा विजय सकारात्मक वातावरण घेऊन आला आहे,’’ असे मॉरिन्हो यांनी सांगितले.

उपांत्यपूर्व फेरीत युनायटेडसमोर वेस्ट हॅमचे आव्हान असेल. वेस्ट हॅमने २-१ अशा फरकाने चेल्सीचे आव्हान संपुष्टात आणले, तर साऊदम्पटने १-० अशा फरकाने संदरलँडचा पराभव केला.