क्रिकेट सुधारणा समितीच्या बैठकीमध्ये आज नाव निश्चित होणार

मुंबईच्या रणजी संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांना आगामी हंगामासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) क्रिकेट सुधारणा समितीच्या बैठकीमध्ये मुंबईचा प्रशिक्षक निश्चित होणार आहे.

एमसीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे आगामी हंगामासाठी भारताचे माजी फलंदाज प्रवीण अमरे आणि यष्टीरक्षक समीर दिघे यांच्यापैकी एकाची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.

पंडित यांनी मागील दोन वष्रे मुंबईला मार्गदर्शन करताना विक्रमी ४१वे रणजी विजेतेपद मिळवून दिले होते. मागील हंगामात मुंबईने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र इंदूर येथे झालेल्या सामन्यात पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने मुंबईला हरवले होते.

अमरे यांना प्रशिक्षकपदाचा मुबलक अनुभव असून, आयपीएल संघांनाही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. याचप्रमाणे मुंबईच्या विविध वयोगटांच्या संघाचे प्रशिक्षकसुद्धा मंगळवारी निश्चित होणार आहेत. अमरे हे एमसीएच्या कार्यकारिणी समितीचे सदस्यसुद्धा आहेत.