मुंबई शहर व उपनगर या दोन्ही संघांनी सहज विजय मिळवत वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील पुरुष गटात बाद फेरीच्या दिशेने वाटचाल केली. पुणे व रत्नागिरी यांनीही लागोपाठ दुसरा विजय नोंदवत बाद फेरीच्या आशा कायम राखल्या.
धनकवडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगर संघाने परभणी संघावर ४६-२२ असा सहज विजय नोंदविला. त्यांच्या या विजयात रिशांक देवडिगा व अमर निवाते यांच्या चौफेर चढायांचा महत्त्वाचा वाटा होता. मुंबई शहर संघाने बीड संघाला ३०-१४ (पूर्वार्ध १७-६) असे हरवल्याचे श्रेय स्वप्निल भाटवणकर व नितीन विचारे यांच्या अष्टपैलू खेळाला द्यावे लागेल.  
सतीश खांबे व वैभव गुरव यांच्या शानदार खेळाच्या जोरावर रत्नागिरी संघाने उस्मानाबादला ५१-१८ असे हरविले. त्यांचा हा लागोपाठ दुसरा विजय आहे. रायगड संघाने सोलापूर संघावर ३५-११ अशी मात करीत पहिला विजय नोंदविला. ठाणे संघाने पालघर संघाचा ३४-२२ असा पराभव केला. त्या वेळी त्यांच्याकडून सुमीत पाटील व उमेश म्हात्रे यांनी सुरेख खेळ केला.
महिलांच्या गटात मुंबई शहर संघाने परभणी या कमकुवत संघाला ५८-१ अशी धूळ चारली. पूर्वार्धात ३३-० अशी आघाडी घेणाऱ्या मुंबईच्या विजयात स्नेहल सांळुके व रेश्मा सावंत यांचा महत्त्वाचा वाटा होता. मनीषा शिंदे व श्रद्धा चव्हाण यांच्या आक्रमक चढायांच्या जोरावर ठाणे संघाने बीड संघाचा ५७-१३ असा दणदणीत पराभव केला.