मुंबईचा ४१६ धावांचा डोंगर, झारखंड ८ बाद १५०
रणजी क्रिकेट स्पध्रेतील झारखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत पहिल्या डावात खणखणीत शतक झळकावणाऱ्या मुंबईच्या अखिल हेरवाडकरने गोलंदाजीतही आपली छाप पाडली. हेरवाडकर आणि इक्बाल अब्दुल्ला यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत मुंबईच्या ४१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या झारखंडची अवस्था दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद १५० अशी दयनीय केली आहे. त्यांना पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी २६६ धावांची आवश्यकता असून कौशल सिंग (२२) आणि जसकरण सिंग (२) खेळत आहेत.
६ बाद ३०३ धावांवरून दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू करणाऱ्या मुंबईने अभिषेक नायरच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर चारशे धावांचा पल्ला पार केला. नायरने १६७ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ७४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला सुफियान शेख (२३) आणि इक्बाल अब्दुल्ला (३३) यांनी चांगली साथ दिली. मुंबईचा डाव ११४.४ षटकांत ४१६ धावांवर संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ४१६ (अखिल हेरवाडकर १०७, श्रेयस अय्यर ४५, सूर्यकुमार यादव ७५, अभिषेक नायर ७४; शाहबाझ नदीम ५-१४० ) वि. झारखंड : ८ बाद १५० (आनंद सिंग ३९, कौशल सिंग खेळत आहे २२; अखिल हेरवाडकर ३-२६, इक्बाल अब्दुल्ला ३-३९).

आसामकडे आघाडी
वलसाड : आसामने उपांत्यपूर्व फेरीत ३२३ धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबचा पहिला डाव १३७ धावांत गुंडाळून दिवसअखेर २०९ धावांची आघाडी घेतली आहे.
म.प्रदेशचा भेदक मारा
मुंबई : मध्य प्रदेशच्या पहिल्या डावातील ३४८ धावांचा पाठलाग करताना बंगालचा डाव १२१ धावांत संपुष्टात आला. मध्य प्रदेशने बिनबाद १४ धावा करून २४१ धावांची आघाडी घेतली.
सौराष्ट्र मजबूत स्थितीत
विझीनगरम : सागर जोगियानी आणि शेल्डॉन जॅक्सन शतकांच्या बळावर सौराष्ट्रने विदर्भाविरुद्ध मजबूत स्थिती गाठली. सौराष्ट्रने ३७५ धावांची मजल मारली.