‘‘आई, यापुढे लोकांकडे धुण्याभांडय़ाची कामे करायची नाहीत, कबड्डीतून मी खूप पैसे मिळवीन,’’ हेच २३ वर्षीय नीलेश साळुंखेने ठणकावून सांगितले. याचे कारणही तसेच होते. प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामासाठी तेलुगू टायटन्सने ११ लाख ७० हजारांची बोली लावून त्याला संघात स्थान दिले. त्यामुळे त्याचे आयुष्यच जणू पालटले आहे.

कल्याण पूर्वेला काही मिनिटांच्या अंतरावर कोळसेवाडी परिसरातील बैठय़ा चाळींमध्ये नीलेशचे १० बाय १२ चौरस फुटांचे घर आहे. शिवशंकर संघाकडून खेळताना आपल्या चतुरस्र चढायांच्या बळावर नीलेशने दोन बाइक्स, दोन फ्रिझ, वॉशिंग मशीन, एलसीडी, डीव्हीडी, सोन्याचे पान, चैन अशा बऱ्याच बक्षिसांची कमाई केली. पण ही सारी संपत्ती ठेवण्यासाठी घर अपुरे पडायचे. अखेरीस प्रो कबड्डीच्या सुखवार्तेनंतर नीलेशने त्याच परिसरात १० बाय २० चौरस फुटांचे घर भाडय़ाने घेतले आहे.

नीलेशच्या घरी गरिबी पाचवीला पुजलेली. आईने लोकांकडे घरकामे केली आणि वडिलांची तुटपुंज्या पगाराची नोकरी. याच बळावर नीलेशसह चार मुलांना त्यांनी मोठे केले. आता कबड्डीच्या माध्यमातून पैसे मिळाल्यावर आई-वडिलांना या वयात काबाडकष्ट करायला लावायचे नाही, असा निर्धार नीलेशने केला आहे.

कबड्डी खेळाकडे कसा वळला, याबाबत नीलेश म्हणाला, ‘‘कबड्डीमुळे काही जणांना नोकऱ्या मिळाल्याची उदाहरणे आसपास होती. त्यामुळेच मला स्वामी विवेकानंद शाळेत शिक्षण घेताना कबड्डीचा लळा लागला. यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खेळावर पैलू पडत गेले.’’

नीलेशने यंदाच्या वर्षी बंगळुरूला झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. एअर इंडियाकडून दोन वष्रे कंत्राटी तत्त्वावर खेळल्यानंतर सध्या महिंद्रा आणि महिंद्रात सागर बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन वष्रे तो खेळतो आहे. चांगली नोकरी मिळाली, तरच कुटुंबाला स्थर्य मिळेल आणि स्वप्नातील घर प्रत्यक्षात साकारू शकेल, असा आशावाद त्याने प्रकट केला.

प्रो कबड्डीपर्यंतचा प्रवास कसा झाला, हे विशद करताना नीलेश म्हणाला, ‘‘गेल्या वर्षी महाकबड्डी लीग झाली होती. ठाणे टायगर्स संघाकडून खेळताना रमेश भेंडिगिरी यांचे मार्गदर्शन मला मिळाले होते. या स्पध्रेत मला सर्वोत्तम चढाईपटूचे बक्षीस मिळाले होते. ही कामगिरी पाहून यू मुंबाच्या संघाने मला शिबिराला बोलावून घेतले होते. पण संघांची प्रक्रिया पूर्ण झाल्याने मला स्थान मिळू शकले नाही. मग तिसऱ्या हंगामात पुणेरी पलटण संघाने स्थान दिले. मात्र मोजक्या सामन्यांत खेळता आले होते. मात्र माझ्या खेळाची पुरती जाणीव असलेल्या प्रशिक्षक भेंडिगिरी यांनी या वर्षी मला कर्तृत्व दाखवण्याची योग्य संधी दिली आहे.’’

मेहनतीने खेळून भारतीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न जोपासले असल्याचे नीलेशने या वेळी सांगितले. त्याने प्रो कबड्डीमध्ये आतापर्यंत २० सामन्यांत खेळताना चढायांचे ६३ गुण कमावले आहेत.