आम्ही क्रिकेट खेळतो आणि त्यातून नावलौकिक मिळवतो. त्यामुळे हा खेळ आमचा ऋणी नाही, उलट आम्हाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या या खेळाचे आम्हीच ऋणी आहोत, अशी भावना व्यक्त करीत श्रीलंकेच्या विश्वविजयाचा शिल्पकार कुमार संगकारा याने खेळापेक्षा खेळाडू मोठा नाही, हेच सत्य प्रांजळपणे अधोरेखित केले.
क्रिकेटविश्वामध्ये आपली एक खास ओळख निर्माण करीत  संगकाराने व्यावसायिकपणाबरोबर खेळभावनाही जपली. त्यामुळेच त्याला क्रिकेटविश्वात मानाचे स्थान मिळाले असले तरी आपल्याला भरभरून देणाऱ्या खेळाला तो विसरला नाही. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आणि कारकिर्दीच्या अंतिम सामन्यात संगकाराने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
‘‘खेळाडू हा कधीच खेळापेक्षा मोठा होऊ शकत नाही. खेळ आहे, त्यामुळेच खेळाडू आहेत. त्यामुळे खेळाडू खेळाचे देणे लागत असतो. हाती दिलेले काम चोख पार पाडणे आणि सर्वोत्तम कामगिरी करणे, हेच एक खेळाडू म्हणून हातामध्ये असते. पण खेळ आपल्याला संधी देत असतो, ती संधी कशी स्वीकारायची, हे प्रत्येकाच्या हातामध्ये असते,’’ असे संगकाराने विश्वविजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
या विश्वविजयाबद्दल बोलताना संगकारा म्हणाला की, ‘‘ यापूर्वी विश्वचषक जिंकण्याच्या आम्हाला चार संधी आल्या होत्या, पण या वेळी आम्ही या संधीचे सोने आम्ही करू शकलो. तुमच्यामध्ये थोडी गुणवत्ता असायला हवी, थोडेसे दैव तुमच्या बाजूने असायला हवे. त्याचबरोबर रणनीती आणि त्याची योग्य अंमलबजावणी करता यायला हवी. हे सर्व योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी व्हायला हवे.’’
विश्वविजयाबद्दल तुझ्या काय भावना आहेत, असे विचारल्यावर संगकारा म्हणाला की, ‘‘हे सारे अद्भुत आहे. हे मी शब्दातीत करू शकत नाही. पहिल्यांदाच मला विश्वविजेत्या संघाचा एक भाग होता आले. यापूर्वी चार वेळा आमच्या पदरी निराशा पडली होती. पण आता थोडे भावुक व्हायला झाले आहे. विश्वचषकाला गवसणी घालणे, हे किती कठीण आहे, याची प्रचीती आम्हाला आली आहे. तुम्ही एकटे कधीच काही करू शकत नाही. तुम्ही जगातील सर्वोत्तम फलंदाज किंवा गोलंदाज असलात तरी संघाच्या पाठिंब्याशिवाय विजय मिळवता येऊ शकत नाही.’’
आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल संगकारा म्हणाला की, ‘‘आतापर्यंतचा प्रवास अविस्मरणीय असाच होता. ही वेळ अलविदा करण्याची आहे. यापेक्षा अलविदा करण्याची संधी येऊ शकत नाही. संघाला माझ्यासाठी आणि महेलासाठी हा विश्वचषक जिंकायचा होता, हे नक्कीच सुखावह आहे. पण देशवासीयांसाठी आम्हाला जिंकायचे होते.’’

खेळाडू हा कधीच खेळापेक्षा मोठा होऊ शकत नाही. खेळ आहे, त्यामुळेच खेळाडू आहेत. त्यामुळे खेळाडू खेळाचे देणे लागत असतो. हाती दिलेले काम चोख पार पाडणे आणि सर्वोत्तम कामगिरी करणे, हेच एक खेळाडू म्हणून हातामध्ये असते. पण खेळ आपल्याला संधी देत असतो, ती संधी कशी स्वीकारायची, हे प्रत्येकाच्या हातामध्ये असते