‘‘भारतीय हॉकी संघाने परिस्थितीनुसार स्वत:ला बदलण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु या बदलामध्ये ते आपली मूळ हॉकी विसरत चालले आहेत. हॉकी हा फसवा खेळ आहे. आपला सहकारी मैदानावर कुठे आहेत, हे प्रतिस्पर्धी खेळाडूला कळू न देता चेंडू त्याच्याकडे पोहोचवण्याचे कौशल्य आत्मसात करता आले पाहिजे. सध्या भारतीय संघ सांघिक सराव करत आहे, परंतु सांघिक सरावापेक्षा वैयक्तिक सराव करणे महत्त्वाचे आहे,’’ असे परखड मत मेजर ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांनी व्यक्त केले.
१९७५च्या विश्वचषक स्पध्रेत निर्णायक गोल करून भारताला जेतेपद मिळवून देणाऱ्या अशोक कुमार यांनी सध्याच्या हॉकीत अनेक सुधारणांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट मत मांडले. ते म्हणाले, ‘‘सध्या भारतीय संघ करत असलेला सराव हा सांघिक आहे. मला कोणताही खेळाडू स्वत:मधील कौशल्य आणखी फुलवण्यासाठी वैयक्तिक सराव करताना दिसत नाही. आमच्यावेळी अनेक खेळाडू दोन-दोन तास वैयक्तिक सराव करायचे. काळानुसार हॉकीत अनेक बदल झाले, हे मीही मान्य करतो. मात्र या बदलाला आपल्या मूळ हॉकीच्या शैलीची जोड दिल्यास संघाची कामगिरी याहून अधिक चांगली होईल. सांघिक सराव हा विदेशातील संघांसाठी फायद्याचा आहे. ते एखादी गोष्ट झटपट आत्मसात करू शकतात, त्या तुलनेत भारतीय खेळाडूंना वेळ लागतो.’’
‘‘भारतात अनेक हॉकीपटूंना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्यापैकी कुणीच भारतीय हॉकी संघाचा प्रशिक्षक होण्यास सक्षम नाही, ही बाब आश्चर्यकारक आहे. विदेशातील प्रशिक्षक आणण्यास विरोध नाही, परंतु त्यांनी भारतीय प्रशिक्षकांना मार्गदर्शन करायला हवे. जेणेकरून कनिष्ठ स्तरापासून खेळाडूंना योग्य दिशा मिळेल. तसेही विदेशी प्रशिक्षकांमुळे भारताच्या कामगिरीतही फार फरक पडलेला दिसतही नाही. उलट भारतीय प्रशिक्षक असताना संघ चांगली कामगिरी करत होता,’’ असे मत व्यक्त करून अशोक कुमार यांनी भारतीय प्रशिक्षकासाठी मोर्चेबांधणी केली.