आपल्या देशात क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल आदी खेळांच्या प्रो लीग स्पर्धाना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. हे लक्षात घेता कुस्तीच्या प्रो लीग स्पर्धेसही तेवढेच सहकार्य मिळेल व ही स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ असणार आहे, असे भारताची राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू गीता फोगाटने खास मुलाखतीमध्ये सांगितले.
अन्य खेळांप्रमाणेच कुस्ती लीग स्पर्धा यशस्वी होईल का ?
हो. आपल्याकडे क्रिकेट व फुटबॉल हे जरी लोकप्रिय खेळ असले तरीही कुस्तीच्या लढतींना भरपूर गर्दी होत असते. अधिकाधिक प्रेक्षकांचा पाठिंबा मिळेल व विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रेक्षकांना ही स्पर्धा कशी आवडेल हे लक्षात घेऊनच प्रो लीग स्पर्धेचे स्वरूप ठरवले जाणार आहे. परदेशातील काही नामवंत खेळाडूंच्या सहभागाचाही फायदा प्रेक्षक खेचण्यासाठी होईल. कबड्डी व हॉकी लीग सुरू झाल्या त्या वेळी प्रेक्षकांचा पाठिंबा किती मिळेल अशी शंका वाटत होती, मात्र या लीग किती लोकप्रिय झाल्या आहेत हे तुम्हाला माहीत आहेच.
भारतीय खेळाडूंना लीगचा कसा फायदा होईल ?
भारतीय खेळाडूंना आर्थिक फायदा होईलच पण त्यापेक्षा परदेशातील खेळाडूंबरोबर कुस्ती खेळण्याची संधी त्यांना मिळणार आहे. या लढतींमुळे त्यांच्या अनुभवात समृद्धता येईल. परदेशी मल्ल कसे डावपेच करतात, ते पूरक व्यायाम कसा करतात. त्यांचा आहार कसा असतो याचे बारकाईने निरीक्षण करण्याची संधी भारतीय खेळाडूंना मिळणार आहे.
महिला खेळाडूंसाठी ही सुवर्णसंधी आहे का?
अर्थातच. या स्पर्धेची घोषणा झाली, त्या वेळी संयोजकांनी महिलांचेही सामने आयोजित करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आम्हा महिला खेळाडूंना अनेक परदेशी खेळाडूंबरोबर लढण्याची संधी मिळणार आहे. पण त्यापेक्षाही आम्ही महिलाही चांगली कुस्ती करू शकतो हे प्रेक्षकांना कळणार आहे. त्यामुळे आमच्या स्पर्धाना यापुढे प्रेक्षक व प्रायोजकांचाही पाठिंबा मिळताना अडचण येणार नाही.
ऑलिम्पिकसाठी कशी तयारी सुरू आहे ?
ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, माझेही ते आहेच. अर्थात त्याआधी मला ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण करायची आहे, ही पात्रता पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. ऑलिम्पिकसाठी अद्याप एक वर्ष बाकी आहे. वर्षभर विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा व प्रशिक्षण शिबिरे याचे मी नियोजन करीत आहे. त्याचबरोबर शारीरिक तंदुरुस्ती व क्षमता वाढविण्यावर भर राहणार आहे.
केंद्र शासनाने ऑलिम्पिकसाठी सुरू केलेल्या योजनेविषयी तुझे काय मत आहे ?
ऑलिम्पिक पदक व्यासपाठ (टॉप) ही योजना खरोखरीच स्तुत्य आहे. पूर्वी परदेशातील प्रशिक्षण शिबिर किंवा परदेशी प्रशिक्षकांद्वारे मार्गदर्शन याकरता खेळाडूंना किंवा त्यांच्या पालकांना बऱ्याच वेळा कर्ज काढावे लागत असे. आता शासकीय निधीद्वारे खेळाडूंना प्रशिक्षणाच्या वेळीच मदत मिळत असल्यामुळे खेळाडूंना शासनाच्या दारी किंवा अन्य प्रायोजकांकडे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. खेळाडूंवरील मानसिक दडपणही दूर होत आहे. खेळाडू फक्त सरावावर शंभर टक्के लक्ष केंद्रित करू शकणार आहेत. कामगिरीच्या आधारेच ही निवड होत असल्यामुळे निधी मिळविताना पारदर्शकता आली आहे.