चेतेश्वर पुजाराने आपले पुनरागमन नाबाद शतकी खेळीचा नजारा पेश करून साजरे केले. एका टोकावरून भारतीय फलंदाजीचा बुरुज ढासळत असताना तो आत्मविश्वासाने खेळपट्टीवर उभा राहिला. त्यामुळेच श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे लवकर थांबवण्यात आला, तेव्हा भारताच्या खात्यावर किमान ८ बाद २९२ धावा जमा होत्या.
२७ वर्षीय पुजाराने (१३५ खेळत आहे) कसोटी कारकीर्दीतील सातवे शतक शनिवारी झळकावले. भारताचा निम्मा संघ ११९ धावांत तंबूत परतल्यानंतरही पुजाराने हिमतीने किल्ला लढवला. त्यानंतर ७ बाद १८० अशी धावसंख्या झाली असताना पुजाराने तळाच्या अमित मिश्रा (५९) सोबत आठव्या विकेटसाठी १०४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यामुळेच भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. पावसामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला, तेव्हा पुजारासोबत इशांत शर्मा २ धावांवर खेळत होता. पावसामुळे आणि ओलसर मैदानामुळे शनिवारी १२ षटकांचे नुकसान झाले.
भारताने २ बाद ५० धावसंख्येवरून सकाळी आपल्या पहिल्या डावाला पुढे प्रारंभ केला. पुजारा आणि कोहली यांनी ५० धावांची उपयुक्त भागीदारी केली. पण अँजेलो मॅथ्यूजने कर्णधार विराट कोहलीला (१८) तंबूची वाट दाखवली. मग रोहित शर्मा (२६), स्टुअर्ट बिन्नी (०), नमन ओझा (२१) आणि रविचंद्रन अश्विन (५) हे फलंदाज झटपट तंबूत परतल्याने भारताची अवस्था दयनीय झाली. पण पुजारा आणि मिश्राने श्रीलंकेच्या गोलंदाजांना बळी मिळवण्यासाठी झगडायला लावले.
श्रीलंकेकडून धम्मिका प्रसाद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ८३ धावांत ४ बळी घेतले, तर न्यूवान प्रदीप, अँजेलो मॅथ्यूज, रंगना हेराथ आणि थरिंदू कौशल यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला. पहिल्या सत्रात यजमानांनी ६९ धावा देत २ बळी घेतले आणि वर्चस्व गाजवले. तर दुसऱ्या सत्रात हाच आवेश कायम राखताना भारताची ७ बाद २२० अशी अवस्था केली.
भारताचा डाव गडगडत असताना पुजाराने खेळपट्टीवर नांगर टाकला. चार कसोटी सामन्यांनंतर भारतीय संघात परतणाऱ्या पुजाराने १७ चौकारांनिशी आली खेळी साकारली, तर मिश्राने त्याला छान साथ देताना आपल्या फलंदाजीचे कर्तृत्व दाखवले.
धावफलक
भारत (पहिला डाव) : लोकेश राहुल त्रि. गो. प्रसाद २, चेतेश्वर पुजारा खेळत आहे १३५, अजिंक्य रहाणे पायचीत गो. प्रदीप ८, विराट कोहली झे. परेरा गो. मॅथ्यूज १८, रोहित शर्मा झे. थरंगा गो. प्रसाद २६, स्टुअर्ट बिन्नी पायचीत गो. प्रसाद ०, नमन ओझा झे. थरंगा गो. कौशल २१, रविचंद्रन अश्विन झे. परेरा गो. प्रसाद ५, अमित मिश्रा यष्टीचीत परेरा गो. हेराथ ५९, इशांत शर्मा खेळत आहे २, अवांतर (लेगबाइज २, वाइड ३, नोबॉल ६, दंड ५) १६, एकूण ९५.३ षटकांत ८ बाद २९२
बाद क्रम : १-२, २-१४, ३-६४, ४-११९, ५-११९, ६-१७३, ७-१८०, ८-२८४
गोलंदाजी : धम्मिका प्रसाद २३.३-४-८३-४, न्यूवान प्रदीप २२-६-५२-१, अँजेलो मॅथ्यूज १३-६-२४-१, रंगना हेराथ २५-३-८१-१, थरिंदू कौशल १२-२-४५-१.