मुर्तूझा ट्रंकवाला याने रणजीमधील पदार्पणाच्या सामन्यात केलेल्या झुंजार शतकामुळेच महाराष्ट्राला सौराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात डावाचा पराभव टाळण्यात यश मिळाले. महाराष्ट्राने दुसऱ्या डावात १३० षटकांमध्ये ८ बाद ३४५ धावा केल्या.

फॉलोऑन मिळाल्यानंतर महाराष्ट्राने २ बाद ११४ धावसंख्येवर दुसरा डाव रविवारी पुढे सुरू केला. महाराष्ट्राच्या फलंदाजांपुढे संपूर्ण दिवसातील ९० षटके खेळून काढण्याचे आव्हान होते. पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही ट्रंकवाला याने सुरेख खेळ करीत शतक ठोकले. अंकित बावणे याने शैलीदार अर्धशतक टोलवीत त्याला यथार्थ साथ दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर चिराग खुराणा व विशांत मोरे यांनीही चिवट लढत देऊन सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळविले. महाराष्ट्राच्या फलंदाजांनी रविवारी ९३ षटके खेळून काढली. सौराष्ट्राला पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळाले, तर महाराष्ट्राला एक गुणावर समाधान मानावे लागले.

ट्रंकवाला व बावणे यांनी सौराष्ट्राच्या संमिश्र माऱ्यास तोंड देत तिसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. त्यामुळेच महाराष्ट्राचा पराभव टाळण्यासाठी पाया रचला गेला. मुर्तूझा याने आत्मविश्वासाने खेळ करीत ११७ धावा टोलविल्या. या स्पर्धेतील पहिलेच शतक टोलविताना त्याने २२ चौकार मारले. त्याच्या पाठोपाठ राहुल त्रिपाठी (०) व बावणे (६०) हे झटपट बाद झाल्यामुळे महाराष्ट्राची ५ बाद २३० अशी स्थिती झाली. बावणे याने १० चौकारांसह ६० धावा केल्या.

खुराणा व मोरे यांनी ७९ धावांची झुंजार भागीदारी करीत संघाचा डाव पुन्हा सावरला. खुराणा याने ८ चौकारांसह ४४ धावा केल्या. मोरे याने सात चौकारांसह ३९ धावा केल्या. शेवटच्या फळीत श्रीकांत मुंडे यानेही खेळपट्टीवर टिच्चून खेळ करीत नाबाद २४ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

  • सौराष्ट्र पहिला डाव १७०.५ षटकांत ८ बाद ६५७ घोषित
  • महाराष्ट्र पहिला डाव ५६.२ षटकांत सर्व बाद १८२ व दुसरा डाव १३० षटकांत ८ बाद ३४५ (मुर्तूझा ट्रंकवाला ११७, अंकित बावणे ६०, चिराग खुराणा ४४, विशांत मोरे ३९, श्रीकांत मुंडे नाबाद २४. धर्मेद्रसिंह जडेजा ४/६४, दीपक पुनिया २/८६).

 

सिद्धेश, अभिषेकची शतके : मध्य प्रदेशविरुद्धची लढत अनिर्णीत

रायपूर : सिद्धेश लाड आणि अभिषेक नायर यांच्या शतकांच्या बळावर मुंबईने ७ बाद ५६८ धावसंख्येवर डाव घोषित केला. मध्य प्रदेशच्या ४४५ धावांसमोर खेळताना मुंबईने या दोन शतकांसह आघाडी मिळवली. कोरडय़ा ठणठणीत खेळपट्टीवर दोन्ही संघांनी धावांची टांकसाळ उघडल्याने सामना अनिर्णीत झाला. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे मुंबईला तीन गुण देण्यात आले.

तिसऱ्या दिवशी मुंबईने ५ बाद २९० वरून पुढे खेळायला सुरुवात केली. शतकवीर अखिल हेरवाडकर १७ धावांची भर घालून माघारी परतला. अंकित शर्माने त्याला पायचीत केले. २० चौकारांसह त्याने १५३ धावांची खेळी केली. तुषार देशपांडेने ९ चौकार आणि एका षटकारासह ६२ धावांची खेळी केली. सिद्धेशने ८ चौकारांसह १०० धावांची, तर अभिषेकने ९ चौकार आणि एका षटकारासह १०३ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक

  • मध्य प्रदेश : सर्वबाद ४४५ (रजत पाटीदार १०६, आदित्य श्रीवास्तव ८७) अनिर्णीत विरुद्ध मुंबई : १८४.१ षटकांत ७ बाद ५६८ डाव घोषित (अखिल हेरवाडकर १५३, अभिषेक नायर १०३, सिद्धेश लाड १००)