राहुल त्रिपाठी व चिराग खुराणा यांनी केलेल्या अखंडित शतकी भागीदारीमुळेच महाराष्ट्राने दिल्लीविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात आव्हान कायम राखले. पहिल्या डावात २३ धावांची आघाडी मिळविलेल्या महाराष्ट्राने शुक्रवारी दिवसअखेर दुसऱ्या डावात ५ बाद १८७ धावा केल्या.
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावात केलेल्या ३३० धावांना उत्तर देताना दिल्लीचा पहिला डाव ३०७ धावांमध्ये आटोपला. त्यांचा कर्णधार गौतम गंभीर याचे शतक केवळ सहा धावांनी हुकले. महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावाची एक वेळ ५ बाद ८२ अशी स्थिती झाली होती. तथापि खुराणा याने नाबाद अर्धशतक टोलवितानाच त्रिपाठीच्या साथीत १०५ धावांची अखंडित भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. महाराष्ट्राने आतापर्यंत २१० धावांची आघाडी मिळविली आहे. सामन्याचा शनिवारी शेवटचा दिवस असल्यामुळे दोन्ही संघांना विजयाची संधी आहे.
गंभीर व रजत भाटिया यांनी ४ बाद २४० धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. त्या वेळी पहिल्या डावात ते सहज आघाडी मिळवतील अशी अपेक्षा होती. तथापि काल ९३ धावांवर नाबाद असलेल्या गंभीर याने केवळ एक धावेची भर घातली नाही तोच खुराणा याने त्याला बाद केले. डॉमिनिक मुथ्थुस्वामी याने गंभीरला सुरेख टिपले. गंभीरने ३४० मिनिटांच्या खेळात सात चौकार व एक षटकारासह ९४ धावा केल्या. त्याने भाटियाच्या साथीत ९२ धावांची भर घातली. ही जोडी फुटल्यानंतर दिल्लीच्या डावाची घसरगुंडी उडाली. भाटिया याने अर्धशतक पूर्ण केले मात्र तो फार वेळ टिकला नाही. त्याने सहा चौकार व एक षटकारासह ६५ धावा केल्या. शेवटच्या फळीत परविंदर अवाना याने आक्रमक २० धावांची भर घातली. त्यामुळेच दिल्लीस तीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला.
महाराष्ट्राकडून अनुपम संकलेचा याने ६२ धावांमध्ये चार बळी घेतले. त्यापैकी तीन बळी त्याने शुक्रवारी मिळविले. समाद फल्लाह (२/८०), खुराणा (२/३५) व मुथ्थुस्वामी (२/४६) यांची त्याला चांगली साथ मिळाली.
महाराष्ट्राचा पहिल्या डावातील शतकवीर स्वप्नील गुगळे हा दुसऱ्या डावात केवळ नऊ धावांवर तंबूत परतला. त्याचा जोडीदार हर्षद खडीवाले याने १२ चौकारांसह ६३ धावा टोलवूनही महाराष्ट्राचा डाव गडगडला. १ बाद ८१ धावांवरुन त्यांची ५ बाद ८२ अशी स्थिती झाली. त्यामध्ये त्यांनी कर्णधार रोहित मोटवानी (७), अंकित बावणे (०) व केदार जाधव (१) यांच्या विकेट्स गमावल्या. महाराष्ट्राची फलंदाजी सहाव्या क्रमांकापासून सुरू होते, हा या मोसमातील अनुभव आजही प्रत्ययास आला.
त्रिपाठी व खुराणा यांनी दीडशे मिनिटे झुंजार खेळ केला. त्यामुळेच महाराष्ट्रास समाधानकारक धावसंख्या रचता आली. त्रिपाठी याने चार चौकार व एक षटकारासह नाबाद ४० धावा केल्या. खुराणा याने १५३ मिनिटांत नाबाद ६३ धावा केल्या. त्याने नऊ चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. दिल्लीकडून अवाना व सुमीत नरवाल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : ३३० व ५ बाद १८७ (हर्षद खडीवाले ६३, राहुल त्रिपाठी खेळत आहे ४०, चिराग खुराणा खेळत आहे ६३, सुमीत नरवाल २/४३, परविंदर अवाना २/४२) दिल्ली : पहिला डाव ३०७ (गौतम गंभीर ९४, वीरेंद्र सेहवाग ६६, रजत भाटिया ६५, परविंदर अवाना २०, अनुपम संकलेचा ४/६२, समाद फल्लाह २/८०, डॉमिनिक मुथ्थुस्वामी २/४६, चिराग खुराणा २/३५)