आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि अभिनेता शाहरुख खान हे दोघंही वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधीत्व करत असले तरी वैयक्तिक आयुष्यात दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आयपीएलच्या आठ पर्वांमध्ये धोनीने चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे प्रतिनिधीत्व केले, तर शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आहे. धोनी सध्या रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाचे प्रतिनिधीत्व करतो. शाहरुखच्या कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलचे दोनवेळा जेतेपद पटकावले असले तरी त्याच्या मनात आजही एक खंत आहे.

‘रईस’ चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित प्रमोशनल कार्यक्रमात शाहरुखने आपली खंत व्यक्त केली. ”भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा समावेश कोलकाता नाईट रायडर्स संघात करू शकलो नाही याची खंत आहे. धोनीला संघात दाखल करून घेण्यासाठी माझे कपडे विकायला लागले तरी चालतील. धोनीसारखे प्रभावी नेतृत्त्व संघात असणे भाग्याचे ठरेल.”, असे शाहरुख म्हणाला.

 

शाहरुखने याआधी क्रिकेटशी निगडीत अनेक कार्यक्रमांमध्ये धोनीचे कौतुक केले आहे. धोनी क्रिकेट विश्वातील ‘बाजीगर’ असल्याचेही शाहरुख म्हणाला होता. ”यार में तो उसको अपना पजामा भी बेचके खरीद लूं, वो आए तो ऑक्शन में.”, असे विधान शाहरुखने केले.
दरम्यान, आयपीएलचे १० वर्षांचा करार यंदा संपुष्टात येत असल्याने पुढील पर्वात सर्वच खेळाडूंचा नव्याने लिलाव होणार आहे. त्यामुळे पुढील पर्वासाठी धोनी देखील लिलावासाठी उपलब्ध असणार आहे. पण पुढील पर्वात चेन्नई सुपरकिंग्ज संघ देखील पुनरागमन करणार आहे. अशावेळी धोनीला संघात दाखल करून घेण्यासाठी चेन्नई आणि कोलकाता संघात चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.