महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट भारतातील २८०० स्क्रीनवर एकाचवेळी रिलिज झाला. सेलिब्रेटींनीही या चित्रपटाचे मोठे कौतुक केले. त्याच्या चाहत्यांनीही हा चित्रपट डोक्यावर घेतला आहे. हा चित्रपट कमाईही चांगली करत आहे. पण सचिनचा खास मित्र असलेल्या विनोद कांबळीच्या एका ट्विटमुळे मात्र चाहतेही भावूक झाले आहेत.

शालेय जीवन व आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या वेळेसची या दोघांची मैत्री खूप प्रसिद्ध होती. खेळात कांबळी हा सचिनपेक्षाही सरस असल्याचे अनेकांचे त्यावेळी मत होते. या जोडगळीने शालेय क्रिकेट स्पर्धेत शारदाश्रम शाळेकडून खेळताना ६६४ धावांची भागीदारी करून विश्वविक्रम रचला होता. सेंट झेवियर शाळेविरोधात त्यांनी ही विक्रमी खेळी केली होती.

या सामन्यात तेंडुलकरने ३२६ तर कांबळीने ३४९ धावा झळकावल्या होत्या. विशेष म्हणजे दोघेही शेवटपर्यंत नाबाद राहिले होते. या दोघांचा प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी धसकाच घेतला होता. कारण दोघांनीही मैदानाच्या कुठल्याच भागात चेंडू टोलावणे शिल्लक ठेवले नव्हते. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाचे अव्वल गोलंदाजही त्यांना गोलंदाजी करण्यासाठी तयार नव्हते.

कांबळीने पुन्हा आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबरील आपला एक जुना फोटो त्याने ट्विट केला असून त्यावर डिअर मास्टर ब्लास्टर, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे त्याने म्हटले आहे. या ट्विटवरून सचिन आणि विनोद कांबळी यांच्यातील एका अनोख्या नात्याची जाणीव होते. कांबळीच्या या ट्विटमुळे अनेक चाहते भावूक झाले आहेत.

‘सचिन अ बिलियन ड्रिम्स’मध्ये सचिनच्या अनेक महत्वाच्या सामन्यातील काही निवडक दृष्ये दाखवलीत. ज्यात सचिनने प्रतिकूल परिस्थितीत सामना खेचून आणला आहे. त्याचबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांचाही यात वेध घेण्यात आला आहे.

हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ आणि तेलगू अशा ५ भाषांमध्ये रिलिज झाला आहे. हा चित्रपट महाराष्ट्र, ओडिशा, केरळ आणि छत्तीसगडमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक हे जेम्स इरिस्कन तर ए. आर. रहमान हे चित्रपटाचे संगीत दिगदर्शक आहेत.