सचिन :अ बिलियन ड्रीम्सनिमित्ताने सचिनचे प्रतिपादन

‘‘आयुष्यातील महत्त्वाच्या चढउतारांप्रसंगी माझ्या मनात काय चालले होते, हे ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ या जीवनपटातून सर्वाना कळेल. त्यामुळे क्रिकेटपटू म्हणून मी सर्वानाच ज्ञात असलो, तरी व्यक्ती म्हणून मी यात उलगडलो आहे,’’ असे भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्या जीवनपटाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केले.

जेम्स इर्सकिने यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला आणि रवी भागचंदका यांची निर्मिती असलेला ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हा सचिनवरील चित्रपट येत्या २६ मेपासून प्रदर्शित होत आहे. सचिनवरील आत्मचरित्र २०१४ मध्ये प्रकाशित झाले होते, त्यानंतर तीन वर्षांनी हा जीवनपट आला आहे. भारताला जगज्जेतेपद जिंकून देण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या सचिनचा प्रवास मांडणाऱ्या या जीवनपटाविषयी सचिनशी केलेली बातचीत –

  • क्रिकेटरसिकांना गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सचिन माहीत आहे. मग हा चित्रपट नवीन असे काय सांगणार आहे?

माझी क्रिकेटची कारकीर्द सर्वानाच माहीत आहे. परंतु आयुष्यातील महत्त्वाच्या चढउतारांप्रसंगी माझ्या मनात काय चालले होते, हे कुणालाच ठाऊक नाही. चित्रपट बनवताना हा हेतू पक्का होता. त्यामुळे चाहत्यांनी पाहिलेल्या सचिनपेक्षा बरेच काही चित्रपटात पाहायला मिळेल, याची मला खात्री आहे. महत्त्वाच्या क्षणांचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत चित्रित केलेले व्हिडीओ आतापर्यंत मी खासगी ठेवले होते. त्यांचासुद्धा या चित्रपटात योग्य ठिकाणी वापर केलेला आहे.

  • भारताकडून खेळताना तू नेहमीच देशाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. परंतु नवा डाव सुरू करताना कोणत्याही फलंदाजावर जसे दडपण असते, तसे चित्रपटाच्या निमित्ताने नवा डाव सुरू करताना तुझ्यावर आहे का?

चित्रपटाच्या निमित्ताने मला माझ्या आयुष्यातील सुंदर क्षण पुन्हा एकदा जगता आले. रवी, जेम्स आणि संपूर्ण चमूने या प्रकल्पासाठी अतिशय मेहनत घेतली आहे. त्यामुळेच आयुष्यातला प्रवास पुन्हा एकदा अनुभवता आला.

  • ‘सचिन तेंडुलकर : प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र आणि ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ या जीवनपटात काय फरक आहे. जीवनातील या दोन सर्वोत्तम कलाकृतींमध्ये तुमची काय भूमिका आहे?

‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्या चाहत्यांना व्यक्ती म्हणून माझी ओळख होईल. प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाताना माझ्या दृष्टिकोनातून हा नायक उलगडला आहे.

  • ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हे नाव तुझ्या जीवनपटाला का ठेवण्यात आले आहे?

जगज्जेतेपद जिंकण्याचे स्वप्न मी बालपणापासून जीवापाड जपले होते. त्यानंतर क्रिकेट कारकीर्द सुरू झाल्यावर देशातील बिलियन म्हणजेच अब्जावधी क्रिकेटरसिकांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा मी निर्धार केला. विश्वविजेतेपदाचा हाच प्रवास यात प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आला आहे.

  • आयुष्य चाळिशीत सुरू होते असे म्हणतात. तू आता ४४ वर्षांचा आहेस. आत्मचरित्र आणि जीवनपट हे तुझे आता प्रदर्शित झाले आहे. पुढील काही वर्षांच्या टप्प्यानंतर सचिनचा एक नवा डाव अवतरेल आणि त्याचीसुद्धा लोकांसाठी प्रेरणादायी अशी कहाणी होऊ शकेल?

माझ्या आयुष्यात असे खरेच काही करता आले तर मला नक्की आवडेल. निवृत्तीनंतरसुद्धा खेळाशीच निगडित अनेक गोष्टींमध्ये कार्य सुरू आहे. निवृत्तीनंतरच्या डावातील नव्या घटना-घडामोडींचा अनुभव मी सध्या घेतो आहे.

  • ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हा संपूर्ण जीवनपट पाहिल्यावर तुझी काय भावना होती?

आतापर्यंत वीसहून अधिक वेळा मी हा चित्रपट पाहिला आहे आणि प्रत्येक वेळा मी भावुक झालो होतो. जेम्स, रवी यांच्या चमूने सुमारे दहा हजारांहून अधिक तासांचे चित्रीकरण संपादित करून यातून एकसंध असा हा चित्रपट साकारला आहे. चित्रपट पाहताना हे शिवधनुष्य त्यांनी जबाबदारीने पेलल्याची प्रचीती येते.

  • देशातील नागरिक तुला नेहमीच क्रिकेटमधील देव संबोधतात. मात्र तू हे दैवत्व नेहमीच नाकारलेस. यापेक्षा स्वप्ने पाहा, ती पूर्ण होतात, असा संदेश दिलास. तुझ्या आयुष्यातील एखाद्या स्वप्नाची पूर्ती व्हायची बाकी आहे का?

देशाचे प्रतिनिधित्व करणे हे माझ पहिले स्वप्न होते आणि त्यानंतर भारताला जगज्जेतेपद मिळवून द्यायचे मी ठरवले होते. तब्बल २२ वर्षांनंतर २०११ मध्ये माझे आयुष्यातील सर्वोच्च स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळेच मी समाधानी आहे.