राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेतील रौप्यपदक विजेती महिला बॉक्सर एल. सरिता देवीला कठीण कालखंडात खंबीरपणे पाठिंबा देणारा भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने स्वाक्षरी असलेली जर्सी भेट दिली. आशियाई क्रीडा स्पध्रेची वादग्रस्त उपांत्य लढत गमावल्यानंतर पारितोषिक वितरण कार्यक्रमात कांस्यपदक नाकारल्याबद्दल सरितावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने बंदी घातल्यानंतर त्याविरोधात सचिनने पुढाकार घेतला होता.
सचिनने ‘ट्विटर’वर म्हटले आहे की, ‘‘सरिता देवीला भेटलो. खेळण्याची ओढ तिच्या डोळ्यांत दिसली. तिच्या यशासाठी शुभेच्छा देताना संदेशात म्हटले, खेळाचा आनंद लूट आणि नेहमी तुझी सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्यासाठी प्रयत्नशील राहा!’’
सचिनने आपल्या निवासस्थानी सरिताची भेट घेतली आणि तिच्यासोबतचे छायाचित्र ‘ट्विटर’वर टाकले. सचिनने आपली स्वाक्षरी असलेली जर्सी तिला भेट म्हणून दिली.
‘‘सचिनच्या पाठबळाबद्दल मी त्याची सदैव ऋणी राहीन. त्याचे आभार मानण्यासाठीच मी ही भेट घेतली,’’ असे सरिताने सांगितले.