ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत शनिवारी झालेल्या निकालांमध्ये धक्कादायक काहीच नसले तरी धोक्याची घंटा मात्र नक्कीच काही खेळाडूंसाठी वाजलेली आहे. महिलांमध्ये अव्वल मानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काला अटीतटीच्या सामन्यात एक सेट गमवावा लागला, पण विजय मिळवत तिने चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. महिलांमध्ये तिसऱ्या मानांकित सेरेना विल्यम्सने मात्र तिसऱ्या फेरीत सहज विजय मिळवला. पुरुषांमध्ये रॉजर फेडरर आणि अ‍ॅन्डी मरे यांना विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागला.
महिलांच्या एकेरीमध्ये अझारेन्काला अमेरिकेच्या हॅम्पटनने चांगलेच झुंजवले. या अटीतटीच्या लढतीत अझारेन्का पहिला सेट जिंकली असली तरी तिला दुसरा सेट गमवावा लागला. पण तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये अझारेन्काने दमदार पुनरागमन करीत हा सामना ६-४, ४-६, ६-२ असा जिंकत चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे.
तिसऱ्या मानांकित सेरेना विल्यम्सने जपानच्या अव्वल मानांकित अयुमी मोरिताचा ६-१, ६-३ असा धुव्वा उडवला.
पुरुषांच्या एकेरीमध्ये रॉजर फेडररला बर्नार्ड टॉमिकने चांगली लढत दिली. फेडररने तिसऱ्या फेरीत टॉमिकवर ६-४, ७-६ (७-५), ६-१ असा विजय संपदान केला. दुसरीकडे ब्रिटनच्या अ‍ॅन्डी मरेने रिकार्डास बेनान्कीसला ६-३, ६-४, ७-५ असे पराभूत केले.