विजेतेपदाचे दावेदार असलेल्या रॉजर फेडरर, स्टानिस्लास वॉवरिन्का व मारिया शारापोव्हा यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत तिसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. तृतीय मानांकित सिमोना हॅलेपला मात्र पराभवाचा धक्का बसला.
माजी विजेत्या फेडररने लौकिकाला साजेसा खेळ करीत स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्सवर ६-२, ७-६ (७-२), ६-३ असा सफाईदार विजय मिळविला. आठव्या मानांकित वॉवरिन्काने दुसान लाजोव्हिकचा ६-३, ६-४, ५-७, ६-३ असा पराभव केला. तिसऱ्या सेटमध्ये लाजोव्हिकने वॉवरिन्काची सव्‍‌र्हिस तोडण्यात यश मिळविले. मात्र चौथ्या सेटमध्ये त्याला स्वत:च्या सव्‍‌र्हिस व फोरहँड फटक्यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचा फायदा घेत वॉवरिन्काने हा सेट घेत सामना जिंकला.
आशियाई खंडाचे आव्हान पेलविणाऱ्या केई निशिकोरी या जपानी खेळाडूने विजयी आगेकूच कायम राखली. पाचव्या मानांकित निशिकोरीने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ करीत ब्राझीलच्या थॉमस बेलुसीला ७-५, ६-४, ६-४ असे पराभूत केले. जर्मन खेळाडू बेंजामिन बेकरने फर्नाडो वर्दास्कोवर संघर्षपूर्ण विजय मिळवीत तिसरी फेरी गाठली. अटीतटीने झालेला हा सामना त्याने ६-४, ०-६, १-६, ७-५, १०-८ असा जिंकला. त्याने बेसलाइन व्हॉलीज व क्रॉसकोर्ट फटक्यांचा सुरेख खेळ केला. माकरेस बघदातीस याचे आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. बोस्नियाच्या दामिर झुमहूरने त्याला ६-४, ६-३, ४-६, ६-२ असे पराभूत केले.
महिलांमध्ये शारापोव्हाने आणखी एक धडाकेबाज विजय नोंदवला. वेगवान व चतुरस्र खेळाचा प्रत्यय घडवीत तिने आपलीच सहकारी व्हिटालिया दियाचेन्कोवर ६-३, ६-१ अशी सहज मात केली. तृतीय मानांकित हॅलेपला क्रोएशियाच्या मिर्जाना लुसिकबरोनीने ७-५, ६-१ असे पराभूत करीत सनसनाटी कामगिरी केली. तिने पहिल्या सेटमध्ये पासिंग शॉट्सचा सुरेख खेळ करीत सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला, तर दुसऱ्या सेटमध्ये तिने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरने स्थानिक खेळाडू अ‍ॅमेदीन हॅसीचा ६-०, ६-१ असा धुव्वा उडविला.

पेस, बोपन्नाची घोडदौड कायम
लिएण्डर पेस आणि रोहन बोपन्ना या भारतीय खेळाडूंनी पुरुष दुहेरीत आपापल्या जोडीदारासह फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेतील घोडदौड कायम राखली आहे. सानिया मिर्झानेही महिला दुहेरीत मार्टिना हिंगिससह आगेकूच केली.
पेस आणि कॅनडाचा डॅनिएल नेस्टर या जोडीने अटीतटीच्या लढतीत जेम्स डकवर्थ आणि ख्रिस गुचीओन या ऑस्ट्रेलियन जोडीचा ६-२, ५-७, ७-५ असा पराभव केला, तर बोपन्ना आणि रोमानियाचा फ्लोरिन मेर्गीआ या जोडीने ५-७, ६-३, ६-४ अशा फरकाने सर्बियन जोडी फिलीप क्राजीनोव्हिक आणि व्हिक्टर ट्रोइकी यांचा पराभव केला. महिला दुहेरीत मिर्झा- हिंगिस जोडीने जर्मनीच्या ज्युलिआ जॉर्जेस आणि झेक प्रजासत्ताकच्या बार्बरा क्रेजसीकोव्हा जोडीवर ६-३, ६-० असा सहज विजय मिळवला.