जागतिक क्रिकेटचे सत्ताकेंद्र असणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय)बदलाचे वारे वाहू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर पदभार सोडण्याची चिन्हे आहेत. याच महिन्यात आयसीसीची बैठक होणार असून, यामध्ये गुप्त मतदान पद्धतीद्वारे संघटनेच्या स्वतंत्र अध्यक्षाची निवड होणार आहे. आयसीसीच्या प्रमुखपदासाठी मनोहर यांचे नाव शर्यतीत आहे. मात्र याबाबत अधिकृतरीत्या बोलण्यास आयसीसी तसेच बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिला. मनोहर क्रिकेटच्या शिखर संघटनेच्या प्रमुखपदी विराजमान झाल्यास बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार तसेच अजय शिर्के यांची नावे चर्चेत आहेत.
पवार सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तर शिर्के महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. आयसीसी आणि बीसीसीआय अशा दोन्ही संघटनांची प्रमुखपदे एकाचवेळी भूषवता येणार नसल्याने अध्यक्षपदासाठी नव्या समीकरणांची जुळवणी सुरु झाली आहे. फिक्सग प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर न्यायमूर्ती लोढा समितीने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे खडतर आव्हान बीसीसीआयसमोर आहे.