डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपल्यावर नवीन प्रशिक्षकाच्या नियुक्तीची घाई न करता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांना संचालकपदावर कायम ठेवले आहे.
या वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याबरोबर क्रिकेट विश्वचषकासाठी शास्त्री यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा फ्लेचर संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. पण त्यांचा कार्यकाळ संपल्यावर शास्त्री किंवा भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्याकडे प्रशिक्षकपद सुपूर्द करण्यात येणार असल्याच्या बातम्या येत होत्या, पण बीसीसीआयने सध्याच्या घडीला सावध पवित्रा घेत प्रशिक्षकाची अद्याप नियुक्ती केलेली नाही.
‘‘ भारताचा बांगलादेश दौरा १० जूनपासून सुरू होत असून या दौऱ्यासाठी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांना संघाचे संचालकपद देण्यात आले आहे. संजय बांगर आणि बी अरुण आणि आर. श्रीधर हे साहाय्यक प्रशिक्षक शास्त्री यांच्याबरोबर काम करतील.’’ असे बीसीसीआयचे सचिन अनुराग ठाकूर यांनी आपल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.
शास्त्री यांची निवड तात्पुरत्या स्वरूपाची आहे. सल्लागार समितीतील सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्याशी सल्लामसलत करून पूर्णकाळ प्रशिक्षकाची निवड बीसीसीआय करणार आहे. ‘‘ शास्त्री यांची निवड फक्त बांगलादेश दौऱ्यासाठी करण्यात आली आहे. या दौऱ्यानंतर प्रशिक्षकाच्या निवडीबाबत चर्चा करण्यात येऊन नियुक्ती करण्यात येईल,’’ असे ठाकूर यांनी सांगितले.
बांगलादेश दौऱ्यामध्ये भारतीय संघ एकमेव कसोटी सामना आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. १० जून रोजी कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर १८, २१ आणि २४ जून रोजी एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. यापूर्वी २००७ मध्ये ग्रेग चॅपल भारताचे प्रशिक्षक असताना शास्त्री यांची संघव्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
सल्लागार समितीची ५ जूनला कोलकाता येथे बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. जुलै महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी प्रशिक्षकाची निवड करण्यात येईल, असे म्हटले जात आहे.