अमित मिश्राची कैफियत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आतापर्यंतच्या कसोटी मालिकेत भारतीय फिरकी गोलंदाजांनी ५० पैकी ४७ बळी मिळवले आहेत, परंतु तरी लेग-स्पिनर अमित मिश्रा आपले नैराश्य लपवू शकला नाही. खेळपट्टीच्या स्वरूपामुळे रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि माझ्या कामगिरीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. फिरकी गोलंदाजांना अपेक्षित श्रेय मिळत नाही, अशा शब्दांत मिश्राने आपली कैफियत मांडली.
‘‘खेळपट्टीबाबत खूप चर्चा होते. मात्र फिरकी गोलंदाजांना त्याचे श्रेय दिले जात नाही. आमच्या कामगिरीचीसुद्धा अधिक चर्चा व्हायला हवी. मायदेशातील अनुकूल वातावरण ही काय आजची स्थिती नाही, गेली १५ वष्रे हेच चालत आले आहे.
जेव्हा आम्ही श्रीलंकेला गेलो होतो, तिथेसुद्धा आम्हाला फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ा लाभल्या होत्या आणि त्याचा आम्ही योग्य फायदा घेतला,’’ अशा भावना मिश्राने प्रकट केल्या.
‘‘जर फिरकी गोलंदाजांची कामगिरी चांगली होत असेल, तर किमान त्यांचे कौतुक व्हायला हवे. फक्त खेळपट्टीच्या अनुकूलतेमुळे फिरकी गोलंदाजांना बळी मिळत नाहीत. परदेशातसुद्धा आम्ही चांगली कामगिरी बजावली आहे,’’ असे ३३ वर्षीय मिश्राने सांगितले.
‘‘आशियाई देशांबाहेर उसळी मारणाऱ्या खेळपट्टय़ा आम्हाला मिळतात. परंतु जेव्हा अन्य संघ भारतात येतात, तेव्हा त्यांना फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टय़ांना सामोरे जावे लागते. हे सारे अनुकूलतेबाबत असते. फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ांवर त्यांच्या फलंदाजांनी आपले तंत्र सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे. आम्ही त्यांना सीमारेषा ओलांडू देणारे चेंडू टाकत नसल्याने त्यांच्यावर मोठे दडपण जाणवते,’’ असे मिश्राने सांगितले.

भारतीय फिरकीपटूंची कामगिरी
गोलंदाज सामने षटके निर्धाव धावा बळी
आर. अश्विन ३ १०२ २५ २५८ २४
रवींद्र जडेजा ३ ८२.५ २१ १९३ १६
अमित मिश्रा २ ४३ ५ १२१ ७