खेळ म्हणजे फक्त क्रिकेट हे समीकरण मागे पडून अन्य खेळही मुख्य प्रवाहात येऊ लागले आहेत. क्रिकेटेतर खेळांच्या शिबिरांना मिळणारा प्रतिसाद हे याचेच द्योतक. दोन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुटीत मुलांची ऊर्जा कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी केंद्रित करावी असा पालकांचा प्रयत्न असतो. बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश, k06टेबल टेनिस या खेळांमुळे मोठय़ा प्रमाणावर शारीरिक व्यायाम होतो तर नेमबाजी, तिरंदाजीमुळे एकाग्रता चांगली होण्यास मदत होते. सायना नेहवाल, सानिया मिर्झा, गगन नारंग यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशामुळे या खेळांच्या प्रसाराला चालना मिळाली आहे.
मुंबईसह राज्यभरात असंख्य ठिकाणी या खेळांची शिबिरे आयोजित करण्यात येतात. दीड-दोन महिन्यांच्या कालावधीत समग्र खेळ शिकवणे शक्य होत नाही, परंतु खेळ
नक्की काय आहे याची कल्पना
मुलांना येऊ शकते. जिमखाना,
क्लब्स यांचे सदस्यत्व सगळ्यांनाच परवडणारे नसते. मात्र शिबिरांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना
खेळाची माहिती करून घेता येऊ शकते. मात्र त्याच वेळी फक्त पैसा कमावण्याच्या हेतूसाठी शिबिरे आयोजित करण्याचा प्रकार वाढतो आहे. शिबिरात  कोण मार्गदर्शन करणार आहे, याचा  अंदाज घेणे आवश्यक आहे.

उन्हाळी शिबिरे एप्रिल-मे महिन्यात होतात. या कालावधीत मुले अभ्यास, क्लासेस या सगळ्या वेळापत्रकापासून दूर असतात. त्यामुळे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा असे कोणत्याही वेळेला मुले सरावासाठी उपलब्ध होऊ शकतात. बॅडमिंटनच्या स्पर्धाचा हंगाम जून-जुलै महिन्यात सुरू होतो. त्याआधी आम्हाला गुणवान खेळाडूंचा शोध घेता येतो. आता नावारूपाला आलेले अनेक खेळाडू उन्हाळी शिबिराच्या माध्यमातूनच समोर आले आहेत. प्ले-स्टेशन, व्हिडीओ गेम्स हे खेळण्यापेक्षा प्रत्यक्ष खेळणे, या शिबिरांमुळे शक्य होते. दीड-दोन महिन्यांत आम्ही सगळे शिकवू शकत नाही, पण खेळातल्या मूलभूत गोष्टींचे ज्ञान दिले जाते.
– श्रीकांत वाड, बॅडमिंटन प्रशिक्षक

शाळांमध्ये मैदान नसते तसेच सोसायटीच्या आवारातही जागा नसते. यामुळे शिबिरांद्वारे मुलांना प्रत्यक्ष खेळायला मिळतं. तिरंदाजीसारख्या खेळात बाणाने लक्ष्यभेद करण्यापूर्वी सूर्यनमस्कार, धावणे, वॉर्मअप अशा गोष्टींवर भर दिला जातो. त्यानंतर रबराच्या साहाय्याने सराव केला जातो आणि त्यानंतर प्रत्यक्ष बाणाने लक्ष्यभेद करायला शिकवले जाते. शिबिराच्या कालावधीत त्यांनी खेळातल्या मूलभूत गोष्टी शिकून त्याचा आनंद लुटावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. तिरंदाजीसारख्या खेळामुळे मुलांची एकाग्रता अचूक होण्यासाठी मदत होते. याचा उपयोग त्यांना अभ्यासात होऊ शकतो. शिबिरात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रगत प्रशिक्षणाचा पर्याय उपलब्ध होतो.
– स्वप्निल परब, तिरंदाजी प्रशिक्षक

ही काळजी घ्या
*ज्या ठिकाणी शिबीर होणार आहे, त्या ठिकाणी पुरेशी सुरक्षाव्यवस्था आहे ना, याची खातरजमा करावी.  
*शिबिराच्या शुल्कात उपकरणे पुरवली जाणार आहेत, का तो खर्च स्वतंत्र करायचा आहे हे विचारा.
*बॅडमिंटन, स्क्वॉश, टेबल टेनिस या खेळांसाठी पुरेशी जागा असणे आवश्यक असते. जेणेकरून शिबिरार्थीना खेळण्याची संधी मिळू शकेल.  
*नेमबाजी किंवा तिरंदाजी हे खेळ इन्डोअर आणि आउटडोअर अशा प्रकारात खेळले जातात. आउटडोअर सरावाला वेळेची मर्यादा असते. त्यामुळे शिबिराची वेळ सुसंगत आहे, हे पाहणे गरजेचे आहे.