निवड समितीच्या कार्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षांनी हस्तक्षेप केल्याचा गौप्यस्फोट मोहिंदर अमरनाथ यांनी केला. अमरनाथ यांचे हे वक्तव्य हीन अभिरुचीचे दर्शन घडविते, असे मत निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी व्यक्त केले आहे.
‘‘माझ्या मते याची अतिशय गुप्तता राहायला हवी. तुम्ही जेव्हा निवड समितीचे सदस्य होता, तेव्हा तुम्हाला बीसीसीआयचे नियम आणि घटना यांची माहिती असायला हवी. मला हे पटलेले नाही. याचप्रमाणे भारतीय क्रिकेटसाठी ते चांगले नाही. निवड समितीच्या बैठकीतील साऱ्या चर्चा गोपनीय राहायला हव्यात आणि यापैकी काहीही बाहेर येणे योग्य नाही,’’ असे मोरे यांनी सांगितले.
‘‘मला फार वाईट वाटले. भारतीय क्रिकेटसाठी हे अयोग्य आहे. तुम्ही खेळाडूंबाबत जी काही चर्चा करता, ती त्या खोलीबाहेर जायला नको, असे खेळाडू म्हणून मला वाटते,’’ असे मोरे यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही तुमचा अहवाल बीसीसीआयला लिहून पाठवा. परंतु प्रसारमाध्यमांसमोर त्याची वाच्यता करणे योग्य नाही. २०११नंतर आपण संघबांधणीमध्ये अधिक मेहनत घ्यायला हवी होती. गतवर्षी विश्वचषक जिंकल्यानंतर चांगला संघ बांधण्याची प्रक्रिया सुरू व्हायला हवी होती. परंतु याच ठिकाणी मी प्रश्नचिन्ह उपस्थित करेन’’, असे मोरे म्हणाले.
‘‘नव्या निवड समितीला फक्त एकच महिना झाला आहे. आपण त्यांना अधिक वेळ द्यायला हवा. त्यांच्यावर बरेच दडपण आहे. आपण भविष्याकडे पाहून चांगला संघ बांधण्याची प्रक्रिया सुरू करायला हवी. ही दोन वष्रे आपल्यासाठी वाईट गेली. परंतु आपल्याकडे देशाचे प्रतिनिधित्व करू शकणारे अनेक गुणी खेळाडू आहेत,’’ असे मोरे यांनी सांगितले.