आंतरराष्ट्रीय मास्टर तानिया सचदेवने अमेरिकन विजेती सबिना फोईसोरला पराभूत केल्यामुळेच भारताला जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत अमेरिकेवर २.५-१.५ असा विजय मिळविता आला. पुरुष गटात मात्र भारताला चीनविरुद्ध १.५-२.५ असा पराभव पत्करावा लागला.

भारताला पहिल्या फेरीत जॉर्जियाविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली होती. त्यामुळेच अमेरिकेविरुद्धची लढत भारतासाठी महत्त्वाची होती. भारताच्या द्रोणावली हरिकाने पहिल्या सामन्यात अ‍ॅना झातोस्किहला बरोबरीत रोखले. पाठोपाठ पद्मिनी राऊतने कॅटरिना नेमकोवाविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. एस. विजयालक्ष्मीने पराभवाच्या छायेतून अक्षिता गोर्तीला बरोबरीत रोखले. त्यानंतर तानियाने फोईसोरविरुद्ध कल्पकतेने डावपेच केले व सनसनाटी विजयश्री खेचून आणली. अमेरिकेविरुद्धच्या विजयामुळे भारताने दुसऱ्या फेरीअखेर पोलंड व युक्रेन यांच्या साथीत संयुक्तपणे दुसरे स्थान घेतले आहे. त्यांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत. रशियाने अपराजित्वाची मालिका राखताना व्हिएतनाम संघाला ३-१ असे पराभूत केले. पहिल्या फेरीत त्यांनी चीनला पराभवाचा धक्का दिला होता. रशियाने चार गुणांसह आघाडी स्थान घेतले आहे.

पुरुष विभागात चीनविरुद्धच्या लढतीत भारताच्या विदित गुजराथीने िदग लिरेन याला बरोबरीत रोखले, तर परिमार्जन नेगी याने लीउ चाओ याच्याविरुद्धचा डाव बरोबरीत सोडविला. बी. अधिबनला चीनच्या यु यांगवेईकडून हार मानावी लागली. शेवटच्या सामन्यात भारताच्या कृष्णन शशीकिरणला वेई येई याच्याविरुद्ध विजयाची संधी साधता आली नाही. त्याला अर्धा गुण स्वीकारावा लागला.  भारताचा हा दुसरा पराभव आहे. आव्हान राखण्यासाठी त्यांना बेलारुसविरुद्धची लढतजिंकणे अनिवार्य आहे. चीन व पोलंड यांनी प्रत्येकी चार गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली आहे. रशिया तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.