भारतीय संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिल्यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाशी (साइ) मानधनाच्या मुद्दय़ावरून मतभेद झाल्यामुळे भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वॉल्श यांच्या राजीनाम्याने भारतीय हॉकीला मोठा झटका बसला असला तरी क्रीडा मंत्रालय या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.
ऑस्ट्रेलियाचे ऑलिम्पिकपटू असलेल्या ६० वर्षीय वॉल्श यांचा करार २०१६च्या रिओ ऑलिम्पिकपर्यंत असून भारतातील क्रीडा अधिकारशाहीला कंटाळून त्यांनी हा राजीनामा दिला आहे. वॉल्श यांच्या राजीनाम्यानंतर क्रीडा मंत्री सरबनंदा सोनोवाल यांनी तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी पुढील २४ तासांच्या आत ‘साइ’कडून याबाबतचा सविस्तर अहवाल मागवला आहे. वॉल्श यांच्या राजीनाम्यामुळे हॉकीक्षेत्रात तर्कवितर्काना उधाण आले असून हॉकी इंडिया आणि ‘साइ’ यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. मानधनाचा मुद्दा आणि ‘साइ’च्या अधिकारशाहीला वैतागून वॉल्श यांनी राजीनामा दिला, असा आरोप हॉकी इंडियाने केला आहे. मात्र वॉल्श यांनी कधीच आर्थिक कारणावरून तक्रार केली नव्हती, असे सांगत ‘साइ’ने हा आरोप फेटाळून लावला आहे.
‘‘माझ्या करारातील नियमांनुसार मी भारतीय पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत आहे. ‘साइ’च्या पदाधिकाऱ्यांच्या वर्तणुकीशी जुळवून घेणे कठीण होऊन बसले आहे. अशा कारभारामुळे व्यावसायिकपणे काम करताना अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यामुळे मी यापुढे भारतीय हॉकीची सेवा करण्याच्या मनस्थितीत नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील दडपणातही यामुळे वाढ झाली आहे,’’ अशा आशयाचे पत्र वॉल्श यांनी ‘साइ’चे महासंचालक जिजी थॉमसन यांना रविवारी पाठवले होते. मंगळवारी प्रसारमाध्यमांना याबाबत कुणकुण लागल्यानंतर मोठा वादंग उठला.
आपल्या अटींनुसार नवीन करार करण्यात आला तर निर्णयाचा फेरविचार करण्याची तयारी वॉल्श यांनी दर्शवली आहे. वॉल्श आणि त्यांच्या काही सहयोगी सहकाऱ्यांना कराराच्या मुद्दय़ावर आक्षेप आहेत. ‘‘हे फारच गंभीर प्रकरण आहे. या प्रकरणी मी ‘साइ’चे महासंचालक आणि क्रीडा सचिवांकडून २४ तासांच्या आत अहवाल मागवला आहे. अहवाल माझ्या हातात आल्यानंतरच या प्रकरणी काय करता येईल, हे मी सांगू शकेन,’’ असे क्रीडा मंत्री सोनोवाल यांनी सांगितले.
‘‘कोणत्याही बाबतीत तक्रारींचा पाढा न वाचणाऱ्या वॉल्श यांच्या राजीनाम्यामुळे मी चकित झालो आहे. जागतिक स्तरावरील सर्वोत्तम प्रशिक्षकांमध्ये गणना होणाऱ्या वॉल्श यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे आम्ही निराश झालो आहोत. साइच्या कारभाराबाबत काही आक्षेप असल्यास, त्यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. वॉल्श हे साइच्या अधिपत्याखाली काम करत नसून आम्ही फक्त त्यांना महिन्याला १६ हजार अमेरिकन डॉलरचा पगार देतो,’’ असे ‘साइ’चे महासंचालक थॉमसन म्हणाले.

पुन्हा चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी एक महिन्याचा कालावधी आहे. या प्रकरणी कशा पद्धतीने तोडगा निघतोय, यावरच माझे भवितव्य अवलंबून आहे. भारतातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीत बदल झाला तरच, २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगता येऊ शकते. मात्र हे बदल होणे फारच गरजेचे आहेत.टेरी वॉल्श