कुमार विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत सोमवारी भारताला बलाढय़ कोलंबियाकडून पराभव पत्करावा लागला, परंतु या निकालापेक्षा भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचीच चर्चा अधिक रंगली. या लढतीत भारताने पहिलावहिला गोल नोंदवला. जॅक्सन थौनाओजामने ऐतिहासिक गोल करत या स्पध्रेतील भारताचे खाते उघडले. भारतीय खेळाडूंनी निर्माण केलेल्या संधीला अंतिम स्वरूप मिळाले असते तर कदाचित हा निकाल यजमानांच्या बाजूने असता. लढतीनंतर प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मातोस मैदानावर धावले आणि भारतीय खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. हा प्रसंग पाहून उपस्थित प्रेक्षकांनीही खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यामुळे हताश भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्मित फुलले. बलाढय़ प्रतिस्पर्धी संघाला दिलेल्या कडव्या झुंजीचे समाधान आणि अभिमान त्यांना वाटत होता. माटोस यांनी आक्रमणपटू रहिम अलीला मारलेली मिठी लढतीनंतरचा हृदयस्पर्शी क्षण होता. या क्षणाने सर्व प्रेक्षकांना भावूक केले.

‘‘भारताचे खेळाडू जीव ओतून खेळले. गोल करण्याच्या संधी गमावल्याने मी रागावलो होतो. या खेळाडूंना मी चांगले ओळखतो. ते अखेरच्या श्वासापर्यंत जिंकण्यासाठी प्रयत्नशील असतात. लढाऊ वृत्ती ही त्यांचे बलस्थान आहे. निकाल बरोबरीत लागला असता तर नक्कीच अधिक आनंद झाला असता. पण आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अनुभव नसतानाही त्यांनी केलेला खेळ हा उच्च दर्जाचा आहे. या संघाचा मला अभिमान वाटतो,’’ अशा शब्दांत माटोस यांनी खेळाडूंचे कौतुक केले.

कोलंबियाचे प्रशिक्षक आर्लाडो रेस्ट्रेपो यांच्याकडूनही भारतीय खेळाडूंचे कौतुक झाले. भारताच्या अन्वर अली आणि नमित देशपांडे या दोन खेळाडूंनी रेस्ट्रेपो यांना प्रभावित केले. ते म्हणाले, ‘‘भारतीय संघाने अविश्वसनीय खेळ केला. त्याबद्दल खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन. त्यांनी उत्तम बचाव केला आणि सांघिक कामगिरी केली. संयम राखून गोल करण्याच्या संधीची वाट पाहणे, इतकेच आमच्या हातात होते.’’

हा गोल केवळ इतिहासात लिहिण्यापुरता मर्यादित नाही. हा गोल भारतातील सव्वाशे कोटी जनतेच्या चेहऱ्यावर स्मित फुलवणारा, युवा फुटबॉलपटूंना आशेचा किरण दाखवणारा आणि भारतीय फुटबॉल क्षेत्रात क्रांती घडवणारा ठरला आहे. भारतीय वरिष्ठ संघाचा गोलरक्षक गुरप्रित सिंग म्हणाला, ‘‘कुमार खेळाडूंनी तुल्यबळ खेळ केला. कोलंबियाविरुद्ध खेळणे तितके सोपे नव्हते. या खेळाडूंचे कौतुक करावे तितके कमीच आहे. या खेळाडूंचा अभिमान वाटतो.’’

भारतीय वरिष्ठ संघातील आक्रमणपटू सी. के. विनितनेही कुमार खेळाडूंच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘‘त्यांची लढत प्रेरणादायी होती. कुमार संघाकडून मला शिकायला मिळेल, असे वाटलेही नव्हते. जॅक्सनने त्याने नाव इतिहासात अजरामर केले आहे.’’