मुंबईचा इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने पाच तास रंगलेल्या लढतीत हैदराबादच्या इंटरनॅशनल मास्टर चक्रवर्ती रेड्डीचा ७४ चालीत निर्णायक साखळी सामन्यामध्ये मात केली आणि अखिल भारतीय फिडे गुणांकित बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. महिला ग्रँड मास्टर भक्ती कुलकर्णीने ५०व्या चालीत विश्वा शाहला पराभूत करून एकूण ८ गुणांसह विक्रमादित्यशी बरोबरी साधली. परंतु उत्तम सरासरीच्या बळावर विक्रमादित्यने अजिंक्यपदाला गवसणी घातली. भक्तीला द्वितीय, तर चक्रवर्तीला (७.५२ गुण) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विक्रमादित्यने राजासमोरील प्याद्याने डावाची सुरुवात केली. प्रत्युत्तर देताना रेड्डीने फ्रेंच बचाव पद्धत अवलंबिली. पाच तास रंगलेल्या सामन्यात रेड्डीकडे खूप कमी वेळ राहिल्यामुळे त्याने घाईघाईत एक प्यादे फुकट देण्याची चूक केली. त्याचा लाभ उठवीत विक्रमादित्यने विजय मिळवला.