भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळे anil kumble यानं पदाचा राजीनामा दिल्यानंतर कर्णधार विराट कोहलीवर virat kohli प्रचंड दबाव वाढलेला आहे. कोहलीसोबतच्या वादामुळे कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याचं समोर आल्यानंतर आता या वादाला कुंबळे विरुद्ध कोहली असं स्वरुप प्राप्त झालं आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) विराट कोहलीला तंबीच दिली आहे. कुंबळेनं प्रशिक्षकपद सोडल्यानंतर संघाची कामगिरी चांगली झाली पाहिजे, त्याची पूर्णपणे जबाबदारी कोहलीवर असेल, असं बीसीसीआयनं सांगितल्याचं कळतं. संघाची कामगिरी उंचावली नाही तर कर्णधारपद सोडावं लागू शकतं, असं बीसीसीआयनं कोहलीला बजावल्याचं एका पदाधिकाऱ्यानं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समिती आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये एक बैठक झाली. त्यात कुंबळेवर अजिबात विश्वास नाही, असं म्हणणं विराट कोहलीनं मांडलं होतं. कुंबळेवर दबाव वाढवला तरच त्याच्यासोबत काम करण्यास मी तयार आहे, असंही कोहलीनं या बैठकीत सांगितलं होतं. पण विराट कोहलीसोबत कोणताही वाद नाही, असं कुंबळेनं सल्लागार समितीला सांगितलं होतं. विराटसोबत काम करण्यास कोणतीही अडचण नाही, असं कुंबळेनं सांगितलं होतं. त्यानंतर सल्लागार समितीनं हे सर्व प्रकरण प्रशासकीय समितीसमोर ठेवलं. हे प्रकरण समितीसमोर गेल्यानंतर अधिकाऱ्यांनीही या वादामुळे चिंता व्यक्त केली होती. प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये पुन्हा अशा प्रकारचा वाद वाढला आणि तो टोकाला गेला तर परिस्थिती आणखी बिकट होईल, असं त्यांना वाटत होतं. पण त्यानंतरही प्रशासकीय समितीनं अनिल कुंबळेनं प्रशिक्षकपदी राहावं, असा सल्ला दिला होता. पण कोहलीसोबतची भागिदारी पुढे शक्य नाही, असं सांगून कुंबळेनं पदाचा राजीनामा दिला.