भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आल्यावर क्रिकेट चाहते केवळ युद्धच व्हायचे बाकी ठेवतात. दोन्ही संघाचे खेळाडू जितका त्वेष, जितकी आक्रमकता मैदानावर दाखवत नाहीत, तितका जोश दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये असतो. भारत आणि पाकिस्तानचे जवान वाघा बॉर्डरवर एकमेकांसमोर उभे ठाकल्यावर तिथे उपस्थित असलेल्या दोन्ही देशांच्या नागरिकांच्या मनात ज्या भावना असतात, त्याच भावना भारत पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्यावेळी दोन्ही देशांमधील क्रिकेट चाहत्यांच्या मनात असतात. त्यामुळेच आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी, लाडक्या खेळाडूचा उत्साह वाढवण्यासाठी चाहत्यांची चढाओढ सुरु असते. मात्र विराट कोहलीला देशाच्या सीमांचे बंधन नाही. कारण ‘विराट’ प्रेमाने अगदी देशांच्याही सीमा ओलांडल्या आहेत. क्रिकेटच्या मैदानात भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानात विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या फेसबुकवरील चाहत्यांचा विचार केल्यास त्याच्या पाकिस्तानमधील चाहत्यांची संख्या ११ लाख ७ हजार ७०४ इतकी आहे. बॉलीवूडचा दबंग सलमान खानच्या पाकिस्तानातील चाहत्यांची संख्या विराट कोहलीपेक्षा जास्त आहे. मात्र विराट कोहली थेट पाकिस्तानच्या संघाला आव्हान देण्यासाठी मैदानात उतरतो आणि अनेकदा आपल्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर संघाला विजयदेखील मिळवून देतो. सलमान खानच्या बाबतीत असा आव्हान देण्याचा प्रकार घडत नाही. त्यामुळेच पाकिस्तानी संघाला मैदानावर थेट आव्हान देणाऱ्या विराट कोहलीचे पाकिस्तानमधील फॅन फॉलॉईंग जास्त महत्त्वपूर्ण ठरते.

विराट कोहलीने अनेकदा पाकिस्तानी संघाच्या तोंडचे पाणी पळवले आहे. कोहली फलंदाजीला आला, त्याने ‘विराट’ फलंदाजी केली आणि भारताने सामना जिंकला, हे आता ‘तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले,’ यासारखे झाले आहे. यंदाचा चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील अंतिम सामना मात्र याला अपवाद ठरला. अंतिम सामन्यात विराट कोहलीला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताचा दारुण पराभव झाला. मात्र तरीही कोहलीच्या याआधीच्या कामगिरीला विसरता येणार नाही. याआधी अनेकदा विराट कोहलीने पाकिस्तानी गोलंदाजांची दाणादाण उडवली आहे. मात्र तरीही पाकिस्तानमधील लाखो लोकांना कोहलीचा खेळ आवडतो. फेसबुकवरील त्याच्या पाकिस्तानमधील चाहत्यांची आकडेवारी हेच सांगते.

ग्राफिक्स सौजन्य- सोशल बेकर्स
ग्राफिक्स सौजन्य- सोशल बेकर्स

यंदाच्या वर्षात विराट कोहलीच्या फेसबुकवरील चाहत्यांमध्ये सातत्याने मोठी वाढ होते आहे. विराट कोहलीच्या फेसबुकवरील चाहत्यांची संख्या तब्बल ३ कोटी ५७ लाख २५ हजार ७१९ इतकी आहे. यातील २ कोटी ९७ लाख ७३ हजार ८१८ चाहते भारतातील आहेत. म्हणजेच विराट कोहलीच्या एकूण चाहत्यांपैकी ८३.३ % चाहते भारतातील आहेत. त्याखालोखाल बांगलादेशमध्ये विराटचे सर्वाधिक चाहते आहेत. बांगलादेशात कोहलीचे १७ लाख २ हजार ८४४ चाहते आहेत. यानंतर पाकिस्तानातील कोहलीच्या चाहत्यांची संख्या ११ लाख ७ हजार ७०४ इतकी आहे. क्रिकेटचे फारसे वेड नसलेल्या नेपाळमध्ये कोहलीचे ४ लाख १८ हजार ६०९ चाहते आहेत. याशिवाय जगभरात कोहलीचे २७ लाख २२ हजार ७४४ चाहते आहेत.

ग्राफिक्स सौजन्य- सोशल बेकर्स
ग्राफिक्स सौजन्य- सोशल बेकर्स